राज्यात होणार २४,००० पैकी फक्त १०,००१ शिक्षकांची भरती
मुंबई, १ मार्च
बहुप्रतिक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळांतील शिक्षक भरतीची जाहिरात काल पवित्र वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्रातील एकूण १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. मात्र, राज्यात २४,००० शिक्षकांची भरती होणार असल्याचे आश्वासन आधी शासनाने दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली.
राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षकभरतीच्या मुद्यावर शासन दरबारी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांसाठी शिक्षकभरतीची जाहिरात काल राज्य शालेय शिक्षण मंत्रालयाच्या पवित्र पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. एकूण १०,००१ जागांपैकी एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती(पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, सर्व साधारण- ९२४ अशाप्रकारे भरल्या जातील.
शिक्षक भरती होणार ? की फक्त परीक्षाच ?
विसंगत म्हणजे, याआधी २४,००० शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य शासनाने राज्यातील शिक्षकांना दिले होते. मात्र, आता प्रत्यक्ष फक्त १०,००० शिक्षक भरती करण्याची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. यामुळे पात्रताधारक युवकांमध्ये नाराजीचा सूर दिसू लागला आहे. एकप्रकारे शासनाने शिक्षकभरतीचा नवा गाजर दाखवल्याने म्हटले जात आहे. तर दुसरीकडे, राज्यातील भाजप कार्यालयाकडून शासनाने शिक्षक भरतीच्या आश्वासनांची वचनपूर्ती केली असल्याचे जाहीरपणे सांगितले जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरूवात. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी #पवित्र पोर्टलद्वारे होणार १० हजार शिक्षकांची भरती. २ मार्च रोजी राज्यातील वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध होणार. @Dev_Fadnavis सरकारची वचनपूर्ती! pic.twitter.com/dbwgLaV5dX
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 28, 2019
राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली होती. राज्यात शिक्षित बेरोजगारांची, अभियोग्यता धारक उमेदवारांची संख्या वाढत जात असतानाही शासनाने आजतागायत शिक्षक भरतीविषयी निरसता दाखवलेली आहे. मात्र ही रखडलेली शिक्षक भरती आता पुन्हा सुरु होत आहे. संबंधित पवित्र पोर्टल व शिक्षक भरतीच्या विविध प्रकारच्या कार्यांसाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने मेहनत घेतली आहे.
“पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे”, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहिरात प्रदर्शनाच्या वेळी म्हटले आहे. सर्व संबंधित गटांशी विचारविनिमय करून त्यांच्या सूचना विचारत घेण्यात आल्या आहेत. ही शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरु करण्यामध्ये सर्व सहभागी जणांचे योगदान आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च रोजी #शिक्षकभरती ची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी #पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे. pic.twitter.com/qPtXlGpLg2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 28, 2019
शिक्षण विभागाच्या कार्यगटाच्या माहितीनुसार, राज्यात सुमारे ५००० च्यावर अतिरिक्त शिक्षक झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या आहेत. ६ जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गांना शून्य जागा दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी होणार आहे. त्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, मात्र तोपर्यंत तिथल्या ५० टक्केच जागा भरल्या जातील.
सध्या शिक्षक भरतीची ही जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांनाच उपलब्ध आहे. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.