डीआरडीओद्वारे स्वदेशी बनावटीच्या संत (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

ब्रेनवृत्त | पोखरण


भारताने आज स्वदेशी संरचना व बनावटीच्या हेलिकॉप्टरद्वारे ‘संत’ (SANT) क्षेपणास्त्राची, म्हणजेच स्टँड-ऑफ अँटी टॅंक मिसाईलची पोखरण चाचणी स्थळावरून चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नेतृत्त्वाखाली ही चाचणी पार पडली.

डीआरडीओ व भारतीय हवाई दल (आयएएफ) यांनी संयुक्तपणे ही चाचणी पूर्ण केली. या चाचणीने चाचणी अभियानाचे निश्चित करण्यात आलेली सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण केली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

“या चाचणी दरम्यान प्रक्षेपण यंत्रणा (रिलीज मेकॅनिझम), प्रगत मार्गदर्शक व टेहळणी प्रणाली (ऍडव्हान्स गायडन्स अँड ट्रॅकिंग अल्गोरिदम), एकीकृत आज्ञावलिंसह असलेले सर्व वैमानिकी तंत्र यांची सुव्यवस्थित कार्य केले आणि देखरेख प्रणालीने सर्व घटनांची योग्य नोंद घेतली”, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा । डीआरडीओद्वारे पिनाका अग्निबाणाच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी !

संत क्षेपणास्त्र (SANT Missile) एका सुरक्षित अंतरावरून अगदी उच्च अचूकतेने मारा करण्याच्या क्षमतेसह युक्त आहे. यासाठी मानक दर्जाच्या मिलिमीटर वेव्ह सिकर (MMW) तंत्राचा वापर करण्यात आला आहे. १० किमी अंतरावर असलेल्या लक्ष्याला हे क्षेपणास्त्र पूर्णपणे निष्क्रिय करू शकते. 

संत (SANT) क्षेपणास्त्राची रचना आणि विकास हैदराबादमधील संशोधन केंद्र इमारातने डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा आणि उद्योगांच्या समन्वय व सहभागाने केली आहे. आयएएफच्या शस्त्रागाराला बळकट करण्यासाठी लांब पल्ल्याचा बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफील्ड शस्त्रास्त्रांनंतर अलीकडच्या काळात चाचणी करण्यात आलेल्या स्वदेशी स्टँड-ऑफ शस्त्रांच्या मालिकेतील हे तिसरे शस्त्र आहे.

नक्की वाचा । वैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्या हाती ब्रह्मोसची धुरा!

प्रगत तंत्रज्ञानासह विविध वापरांसाठी विविध कॉन्फिगरेशन्सचा स्वदेशी विकास म्हणजे संरक्षणातील ‘स्वयंपूर्णते’कडे टाकलेले एक भक्कम पाऊल आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अभियानाशी संबंधित चमूचे अभिनंदन केले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सोबतच, डीआरडीओचे संचालक जी. सतीश रेड्डी म्हणाले, की संत (SANT) क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे स्वदेशी संरक्षण क्षमता आणखी वाढेल.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: