Site icon MarathiBrain.in

पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी !

अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांची कोव्हिड-१९ साठीची ‘आरटी-पीसीआर’ तपासणी करण्यात येईल. ज्या सदस्यांची कोव्हिड-१९ चाचणी निगेटिव्ह आली असेल, त्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

ब्रेनवृत्त | मुंबई

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर आयोजित होणार आहे. सध्याची कोव्हिड-१९ परिस्थिती पाहता सुरक्षित सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकांमध्ये वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कामकाजमंत्री ॲड. अनिल परब,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेनविश्लेषण | ‘कोव्हिड-१९’मुळे आफ्रिकेत पाच लाख एड्सग्रस्त दगावण्याची शक्यता

या बैठकांमध्ये कोव्हिड-१९ परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोव्हिड-१९ साठीची ‘आरटी-पीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. ज्या सदस्यांची कोव्हिड-१९ चाचणी निगेटिव्ह आली असेल अशा सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी

● अधिवेशनाची नियमावली

– सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे.

– सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.

– सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू टाकून करण्यात येईल.

– सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.

– या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.

(साभार : महासंवाद)

Exit mobile version