वाहन विषयक कागदपत्रांच्या परवाना मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ !

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स, पीयुसी आदी. अनेक गोष्टींची मुदत संपल्यामुळे सरकारी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे देशातील ज्यांचे वाहन परवाना, वाहनाचे दस्तावेज, पीयुसी यांसारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट अशा अनेक गोष्टींची मुदत संपलेली आहे. अशातच, या काळात पोलिसांकडून सुरु असलेल्या काटेकोरपणाच्या तपासणीमुळे अत्यावश्यक कारणांसाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरविला जात होता. त्यामुळे, अशा लोकांना ‘केंद्रीय मोटार वाहन नियमां’मधून सूट देण्यात आली असून, या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य आहे. ‘मोटार वाहन अधिनियम,१९८८’ आणि ‘मोटार वाहन अधिनियम, १९८९’ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ‘सार्वजनिक वाहतुकीची स्थिती सुधारण्यासाठी महासंघाच्या सदस्यांच्या वतीने काही सूचना करण्यात आल्या आहेत. यांत व्याज-देयकाची सवलत वाढविणे, सार्वजनिक वाहतूक सुरू करणे, राज्य कर टाळणे आणि विमा धोरणाची वैधता वाढविणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच, ‘देश आणि उद्योग दोन्ही एकाच वेळी दोन लढाई जिंकतील, एक म्हणजे कोरोना विरुद्ध आणि दुसरी आर्थिक मंदीच्या विरोधात’, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

गाडी चालवताना मोबाईल वापरणार, तर परवाना रद्द होणार!

दरम्यान, कोणतेही वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि पीयूसी अशी चार कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे छापील प्रत नसेल, तर मोबाईलमध्ये डिजिटल कॉपी ठेवने आता आवश्यक असणार आहे. त्यासाठी ‘डिजिलॉकर’ किंवा ‘एम. परिवाहन’ हे अनुप्रयोग तुम्हाला वापरावे लागणार आहे. दरम्यान, यापूर्वीच नवीन वाहतूक नियम लागू करताना गडकरींनी शिस्त लावण्यासाठी दंडामध्ये १० पटींनी वाढ केली होती. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना  १० हजारांचा दंड आकारला जात आहे. तर, अल्पवयीन तरुण-तरुणी वाहन चालविताना सापडल्यास वाहन मालकाला तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.

एकीकडे, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 17 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या काळात बस, रेल्वे आणि विमान  सेवांही बंद आहेत. तर दुसरीकडे, देशात ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहचवण्यासाठी रेल्वेने १०० हून अधिक विशेष गाड्या सुरु केल्या आहेत.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: