केंद्राच्या संमतीविना राज्यांत परत टाळेबंदी नाही !

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

केंद्र शासनाच्या संमतीविना आता राज्यांना परत टाळेबंदी (लॉकडाऊन) करता येणार नाही, पण प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे  केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुधारीत कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ह्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील विविध भागांत ‘डायनॅमिक कंटेनमेन्ट झोन’ स्थापन करण्याची गरज सांगितले होते. त्यामुळे असे कंटेनमेन्ट झोन कोणते आहेत, याची जिल्हा प्रशासनाकडून निश्चिती करून घ्या, अशी सूचनाही शहा यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली होती.  परिणाम जिल्ह्यांमध्ये जितके कंटेनमेन्ट झोन असतील त्यांची यादी राज्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी व केंद्रीय आरोग्य विभागालाही द्यावी. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करावी व त्यांना विलगीकरणात ठेवावे, अशाही सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

वाचा | फेब्रुवारीपर्यंत किमान ५०% लोकसंख्या असेल कोरोना संक्रमित !

दरम्यान, नव्याने टाळेबंदी लागू करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घ्यावी लागेल. पण कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल. पण या क्षेत्रातील स्थितीवर राज्यांना अधिक बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणा आणखी मजबूत करायला हवी, असेही मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगण्यात आले आहे.

सोबतच, लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनावर असेल. कंटेनमेन्ट झोनमधील लोकांच्या हालचालींवर नियंत्रणे आणावीत. वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही या झोनमधून बाहेर जाऊ देऊ नये. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असेेेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: