ऑलम्पिकवरही कोरोनाचे ग्रहण : आढळला पहिला रुग्ण
ब्रेनवृत्त | टोकियो
आधीच एक वर्ष लांबणीवर गेलेल्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेवरील कोरोनाचे ग्रहण काही संपायचे नाव घेत नाही. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑलम्पिकचे ज्या गावात आयोजन करण्यात आले आहे, त्या गावात कोव्हिड-१९ बाधित पहिला रुग्ण आढळला असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
टोकियो ऑलम्पिक नियोजन समितीचे प्रवक्ते मसा टकाया म्हणाले, “गावात एक अशी व्यक्ती आहे, जिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तपासणीच्या वेळी आतापर्यंत आढळलेले हे पहिले कोव्हिड-१९ रुग्ण आहे.” दरम्यान, या रुग्णाची ओळख आणि मूळ देशाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
वाचा । खेळरत्न पुरस्कारासाठी अश्विन व मिथाली राजच्या नावांची शिफारस
त्यापूर्वी, शुक्रवारी नरिता विमानतळावर नायजेरियाच्या ऑलम्पिक शिष्टमंडळातील एक सदस्य कोव्हिड-१९ सकारात्मक आढळले होते. त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. ६० वर्षांपुढील वय असणाऱ्या या व्यक्तींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती, पण उच्च वयोमान आणि नंतर काही गंभीर घटना घडू नये, याची काळजी म्हणून त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मागील वर्षी नियोजित असलेले टोकियो ऑलम्पिक २०२० स्थगित करण्यात आली होती. आता येत्या २३ जुलैपासून ही स्पर्धा कोव्हिड-१९ संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करत व प्रेक्षकांविना सुरु होणार आहे. महासाथरोगामुळे टोकियो शहरात अजूनही आपत्कालीन स्थिती कायम आहे, पण तरीही विविध उपाययोजनांसह ही स्पर्धा आयोजित होणार आहे.
हेही वाचा । कोरोनामुक्त बालके परत रुग्णालयांच्या वाटेवर!
टोकियोमध्ये आयोजित या ऑलम्पिक व पॅरॉलम्पिक स्पर्धेत १५,४०० खेळाडूंचा सहभागी असणार आहेत. याव्यतिरिक्त माध्यम, प्रसारण, अधिकारी, निर्णायक व इतर अशा जवळपास दहा हजार लोकांची उपस्थिती टोकियो शहरात असेल. संपूर्ण ऑलम्पिक स्पर्धेचा अधिकृत खर्च १५.४ बिलियन डॉलर्स इतका आहे. यापैकी जवळपास ६.७ बिलियन डॉलर्स खर्च हा जनतेच्या पैशातून असेल.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in