भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आपल्या पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्यासाठी ३१ मार्च ही नवीन मुदतवाढ ग्राहकांना दिली आहे. ही मुदतवाढ दुसऱ्यांदा करण्यात आली आहे.
वृत्तसंस्था
मुंबई , फेब्रुवारी १२
स्वतःच्या पसंतीच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांची (टीव्ही चॅनेल्स) निवड ग्राहकांना करता यावी यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. प्राधिकरणाने वाहिन्यांची निवड करण्यासाठी आता ३१ मार्च ही नवी अंतिम मुदत दिली आहे.
‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया’ (ट्राय) ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्या निवडता याव्यात म्हणून संबंधित निर्णयाची गांभीर्याने अंमलबजावणी करीत आहे. आपल्या पसंतीचे चॅनेल्स निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ग्राहकांना सुरवातीला २९ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ट्रायने अंतिम मुदत वाढवून ती ३१ जानेवारी केली. आता पुन्हा एकदा मुदतवाढ करत ट्रायने ३१ मार्च ही तारीख अंतिम मुदत म्हणून जाहीर केलं आहे. नव्या नियमांनुसार आपल्या आवडीची टीव्ही चॅनेल्स कशी निवडावीत, याबाबत अनेकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याचे जाणवल्याने ही मुदतवाढ करण्यात आली आहे.
आधी दिलेल्या मुदतीपर्यंत, म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत १७ कोटींपैकी फक्त ९ कोटी ग्राहकांनीच नवीन प्लान सुरु केला आहे. यामध्ये केबल सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या साडेसहा कोटी, तर डीटीएच वापरणाऱ्यांची संख्या अडीच कोटी आहे. ट्रायने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार ग्राहकांना ज्या वाहिन्या पहायच्या आहेत, त्यांचेच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीची टीव्ही चॅनेल्सची निवड करायची आहे. या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना टीव्ही पाहणे खूप होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.
सुरुवातीला २९ डिसेंबर २०१८ पर्यंत असलेली मुदत एक महिन्याने वाढवून ती ३१ जानेवारी करण्यात आली होती. ही मुदत आता आणखी दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्यासाठी दोन महिन्यांचा अधिकचा वेळ मिळाला आहे.
◆◆◆