ट्विटरचे नवे ‘सेल्फ एडिट फिचर’
‘ट्विटर’ या कंपनीने नुकतेच एक वैशिष्ट्य (फिचर) अद्ययान्वित केले आहे. या फिचरचे ‘सेल्फ एडिट फीचर’ असे नाव असून, ट्विटरच्या व्यासपीठावर (प्लॅटफॉर्म) चुकीच्या अथवा अश्लील भाषेचा वापर रोखण्यासाठी हे फिचर जोडले गेले असल्याचा दावा ट्विटरने केला आहे.
ब्रेनवृत्त, ७ मे
अलीकडच्या काळात आपल्या भारतात समाज माध्यमांचा (सोशल मिडीया) वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातल्या त्यात या लॉकडाऊनच्या काळात तर देशातील जवळपास सर्व लोक घरातच आहे. त्यामुळे, विविध डिजिटल समाज माध्यमांशिवाय दुसरे कोणतेच अभिव्यक्तीचे साधन लोक वापरताना दिसत नाही. पण दुसरीकडे, नकारात्मक परिणाम म्हणून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर चुकीच्या, अश्लील भाषेचा वापरही प्रचंड वाढला आहे. विशेषतः फेसबुक, ट्विटरवर अशी अपमानास्पद आणि अश्लील भाषा वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचवेळी, बरेच वापरकर्ते अभिनेते आणि राजकारण्यांवर अश्लील टिप्पण्याही देतात. हे लक्षात घेता समाज माध्यमांच्या प्रस्थापित कंपन्यांनी काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
‘ट्विटर‘ या कंपनीने नुकतेच एक वैशिष्ट्य (फिचर) अद्ययान्वित केले आहे. या फिचरला ‘सेल्फ एडिट फीचर’ असे नाव देण्यात आले आहे. ट्विटरच्या व्यासपीठावर (प्लॅटफॉर्म) चुकीच्या अथवा अश्लील भाषेचा वापर रोखण्यासाठी हे फिचर जोडले जात आहे. ट्विटरच्या सपोर्ट हँडलद्वारे या फिचरची माहिती ट्विट करण्यात आली आहे. “चुकीच्या भाषेला आळा घालण्यासाठी अनेक मार्गांनी आम्ही काम करत आहोत”, असा दावा ट्विटरने केला आहे. तथापि, हे फिचरसध्या केवळ iOS वापरकर्त्यांनाच चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने खातेदार आपले ट्विट पोस्ट करण्यापूर्वी स्वत:च संपादन करू शकतात. तसेच, कंपनी येत्या काही महिन्यांत हा पर्याय अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देणार आहे.
When things get heated, you may say things you don't mean. To let you rethink a reply, we’re running a limited experiment on iOS with a prompt that gives you the option to revise your reply before it’s published if it uses language that could be harmful.
— Twitter Support (@TwitterSupport) May 5, 2020
भारतात लवकरच सुरू होतंय ‘व्हाट्सऍप पे’ !
● हे फिचर कसे काम करते ?
हे फिचर एखादे ट्विट पोस्ट करण्यापूर्वी वापरकर्त्यांना सतर्क करेल. एखाद्या ट्विटला किंवा कोणत्याही अन्य वापरकर्त्याला प्रत्युत्तर देताना, सामग्रीमध्ये एक आक्षेपार्ह शब्द किंवा चुकीची भाषा वापरली गेली, तर ट्विटर त्यास सतर्क करेल. तसेच, ट्विटर वापरकर्त्यास पोस्ट संपादित करण्याचा सल्ला दिला जाईल. जर लिखाणात हानीकारक असे काही आढळले, तर त्याविषयीची सूचना ट्विटरवर पॉपअपच्या स्वरूपात येईल आणि त्यानंतर ट्विटर एआय/एमएल डिव्हाइस आधीपासूनच असे चुकीचे शब्द पकडण्याचा प्रयत्न करतील व ट्विटमध्ये सुधारणा करण्यास मदत करतील.
◆◆◆