Site icon MarathiBrain.in

‘पाणी पुरस्कार’साठी नामांकन अर्ज भरण्याचे युजीसीचे शिक्षणसंस्थांना आदेश

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे यंदाच्या ‘पाणी पुरस्कार २०१९’ साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर युजीसीने शैक्षणिक संस्थांना पाणी संवर्धनाविषयी विशेष आदेश देणारे परिपत्रक जारी केले आहे.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

देशातील नागरिकांमध्ये पाणी बचतीच्या सवयीला प्रोत्साहित करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयातर्फे यंदाचे ‘राष्ट्रीय पाणी पुरस्कार २०१९’ जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) ने देशातील उच्चशिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पाणी बचतीच्या संदर्भात विविध उपक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच, पाणी पुुरस्कारासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नामांकन अर्ज सादर करण्याचे आदेश आयोगाने दिलेे आहे.

रेल्वे निघाली घेऊन पाणी, चेन्नईत पाणीबाणी !

उच्चशिक्षण संस्थांना पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी व जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या यंदाच्या पाणी पुरस्काराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर युजीसीने परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार, ‘पाणी बचतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये सवय लागावी यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी आवश्यक ते उपक्रम विद्यापीठ आवारात राबवावेत. हे विविध उपक्रम सामुदायिक शिक्षण आणि जागरूकता निर्माण करणारे असावे. तसेच, पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन या संबंधी जलशक्ती मंत्रालयाने विविध क्षेत्रात पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे, त्यासाठी नामांकन भरावे.”

केंद्रीय भूजल मंडळाकडे पाणी पुरस्कारासाठी अर्ज सादर करायचे असून, ३० नोव्हेंबर ही नामांकन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाच्या व मंडळाच्या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

Exit mobile version