ब्रेनविशेष : उजेडाचे मानकरी

थोर समाजसुधारक, आद्यशिक्षक व क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने प्रा. जगन्नाथ विभुते यांनी लिहिलेल्या ‘उजेडाचे मानकरी‘ या पुस्तकातील महात्मा फुले यांच्यावरील लेखाचा निवडक अंश इथे प्रकाशित करीत आहोत. 

 

ब्रेनविशेष | दिग्विजय विभुते

 

“महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या आणि ज्यांच्या पुढाकाराने झाल्या, त्यामध्ये ‘महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल व त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल.”

प्रसिद्ध शिक्षणतज्ञ विठ्ठलराव घाटे यांचे वरील वाक्य खूप काही सांगून जाते. त्याकाळी संपूर्ण समाज वर्णव्यवस्थेच्या कुलंगड्यात अडकून पडलेला होता, सनातन्यांच्या कर्मकांडाला ऊत आला होता आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरुवात केलेली होती. त्याच काळात बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी-परंपरा यांच्या कर्दमात खितपत होता; दुःख व दारिद्रय त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. अशावेळी ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हे ज्योतीरावांनी ओळखले.

राजकीय गुलामगिरीपेक्षाही सामाजिक व मानसिक गुलामगिरी ही भयानक असते. यामुळे शोषितांच्या वाट्याला जनावरासारखे जगणे येते, शोषकांचे हिंस्त्र श्वापदात रूपांतर होते, याची दूरदृष्टीच्या जोतिरावांना जाणीव झाली. त्यातून शाळा सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात उचल खावू लागला. “पुरुषवर्गापेक्षाही स्त्री वर्गाला शिक्षणाची अधिक गरज आहे. केवळ शिक्षणच त्यांची सामाजिक दास्यातून सुटका करू शकेल. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होईल; घरदार ज्ञानाने व मनाने उजळून निघेल”, याच विचाराने १८४८ साली वयाच्या २१ व्या वर्षी ज्योतीरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

महात्मा फुलेंचे हे कार्य अत्यंत धाडसाचे आणि क्रांतिकारक होते. या शाळेत शिक्षिका मिळणे दुरापास्त झाले, तेव्हा ज्योतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना स्वतः शिकवले. मिसेस मिचोल यांच्या मार्गदर्शनातून त्यांना प्रशिक्षित शिक्षिका बनवले. त्यानंतर सावित्रीबाई मुलींना शिकवण्याचे काम करू लागल्या. हे काम करताना फुले दांपत्याला खूप यातना व अवहेलना सहन कराव्या लागल्या, तरीही समाजसुधारणेच्या व्रतापासून हे दांपत्य तसूभरही ढासळले नाही.

सन १८४८ ते १८५२ या काळात सावित्रीबाईंच्या सहकार्याने ज्योतीरावांनी एकूण १८ शाळा सुरु केल्या आणि त्या यशस्वीपणे चालविल्या. या शाळांना मुंबई इलाख्याचे विद्याधिकारी सर अर्स्कीन पेरी यांनी भेट दिली, शाळांची तपासणी करून उत्तम अभिप्राय दिला आणि फुल्यांच्या या कार्याची शासनाकडे शिफारस केली. इंग्रज सरकारने या कार्याची दखल घेतली. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यातील विश्रामबाग वाड्यात एका समारंभात मेजर कँडी यांच्या हस्ते शालजोडी देऊन ज्योतीरावांचा शासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ज्योतीरावांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन उदात्त आणि मानवतावादी होता. प्राथमिक शिक्षण वयाच्या १२ वर्षापर्यंत सक्तीचे करावे, शेतकऱ्यांच्या व गरिबांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, अभ्यासक्रमात धंदेशिक्षणावर भर द्यावा, अभ्यासक्रमात मोडी बाळबोध लेखन, वाचन, हिशोबाची माहिती, इतिहास, भूगोल, व्याकरण, शेतीचे प्राथमिक ज्ञान, नीती व आरोग्य यांचे प्राथमिक धडे असावे; शिक्षक प्रशिक्षित असावेत, त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून गावकारभारात त्यांचा सहभाग घ्यावा, शक्यतो शाळा आणि शिक्षणसंस्था सरकारी नियंत्रणात आणाव्यात. या साऱ्या बाबी पाहिल्यावर ज्योतीरावांचे शिक्षणविषयक चिंतन किती उदात्त होते याची साक्ष पटते.

ग्रंथांतून, धर्मशास्त्रातून स्त्रियांना देवता मानणारी आपली संस्कृती प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ‘न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति!’ असे म्हणत स्त्रियांचे स्वातंत्र्य नाकारते. ही गोष्ट ज्योतीरावांच्या मनात सलत होती. सामाजिक दास्यातून स्त्रियांची सुटका करण्यासाठी ज्योतीरावांनी धाडसी पाऊल उचलले. पुरुष वर्गाकडून फसवणूक झालेल्या अनेक विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह त्यांनी घडवून आणले. शासन दरबारी हा प्रश्न नेऊन १८५६ साली ‘विधवा पुनर्विवाह कायदा’ त्यांनी संमत करवून घेतला. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधकगृह स्थापन केले. स्त्रियांना विद्रुप करणाऱ्या केशवपन पद्धतीला कडाडून विरोध केला. त्यासाठी पुण्यातील न्हाव्यांचा संप घडवून आणला.

स्त्री-शक्ती जागृत करणे, तिला स्वावलंबी बनविणे आणि समाजोद्धाराच्या कार्यात त्यांचा सहभाग वाढविणे, हे जोतीरावांचे खरे ध्येय होते. समाजातील स्त्री वर्ग, दलित वर्ग व शेतकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राम्हणाचे कसब, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म असे ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘अखंड’ नावाची काव्यरचना करून धर्मसंस्था, कर्मकांड, भोंदूगिरी यावर त्यांनी टीका केली. ज्योतीराव फुले खऱ्या अर्थाने मानवता धर्माचे उपासक होते. मानवाने निर्माण केलेल्या धर्मासाठी भांडणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे. त्यांच्या मते, ‘सत्य हाच निर्मिकाचा खरा धर्म आहे.’ म्हणून ते म्हणतात,निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक | भांडणे अनेक कशासाठी ||”

“सर्वसाक्षी जगत्पती | त्याला नकोच मध्यस्थी ||”, हे ज्योतीरावांनी सर्व समाजाला ‘सत्यधर्म समजावा’ म्हणून स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’चे ब्रीदवाक्य होते. ज्योतीरावांचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या संदेशाने भारलेले होते. समाजातील उपेक्षित, वंचित आणि पिचलेल्या वर्गाच्या उत्थानाचे कार्य आयुष्यभर करणाऱ्या या ज्योतिरावांना १८८८ साली जनतेनेच उत्स्फूर्तपणे ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. म्हणूनच त्यांचा गौरव करताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात,

“सत्याचा पालनवाला हा धन्य जोतिबा झाला |

पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला ||”

 

(पुस्तक : उजेडाचे मानकरी, लेखक : प्रा.जगन्नाथ विभुते)

 

लेखन : दिग्विजय विभुते 
ट्विटर : @Digvijay_004
ई-पत्ता : digvijayjvibhute@gmail.com

संपादन व मुद्रितशोधन : मराठी ब्रेन

(लेखक अभियंता व नवउद्योजक असून, विविध विषयांवर मुक्तलेखन करतात.)

इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.

Join @marathibrainin

लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

One thought on “ब्रेनविशेष : उजेडाचे मानकरी

 • November 28, 2020 at 6:34 pm
  Permalink

  उत्कृष्ट लिखाण…👌👌
  महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू.
  स्त्रिशिक्षणाचे जनक, सत्यशोधक चळवळीचे संस्थापक, बहुजनांचे कैवारी, खर्याअर्थानं महात्मा….
  या थोर व्यक्तीमत्वाची आज पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींस त्रिवार अभिवादन🙏

  धन्यवाद दिग्विजय सर🙏❤️

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: