‘रशिया-युक्रेन वाद ; नव्या युगाची जुनी कहाणी’

मागील आठवड्यात ‘जी-२०’ देशांच्या बैठकीच्या मुहूर्तावर रशियाच्या नौदलाने युक्रेनी नौदलाच्या तीन जहाजांवर हल्ला चढवला होता. त्यामुळे रशिया आणि युक्रेनचे सैन्य अमोरासमोर आले आहेत. मात्र रशिया-युक्रेनमधील हा वाद आताचा नसून, त्यास खूप वर्षांपासूनची पार्श्वभूमी आहे.

 

ब्रेनसाहित्य । ०९ डिसेंबर २०१८


जागतिक पातळीवरील दोन मोठ्या घटना मागील आठवड्यात एकाच वेळी घडल्या. त्या म्हणजे ‘जी-२०’ देशांची अर्जेंटिनामध्ये आयोजित झालेली बैठक आणि त्या बैठकीच्याच ऐन मुहूर्तावर रशियाने उध्वस्त केलेली काळ्या समुद्रातील युक्रेनच्या नौदलाची जहाजे. खरंतर, ‘जी-२०’ देशांची शिखर परिषद आणि रशियाचा युक्रेनी जहाजांवरील हल्ला, ह्या दोन्ही गोष्टींचा वरवर संबंध दिसत नसला, तरी एकाच वेळी घडलेल्या या दोन्ही घटना काही प्रश्न नक्कीच उपस्थित करून जातात.

    छायाचित्र स्रोत : Bangor Daily News

खरंतर, रशिया आणि युक्रेन यांच्यात अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची वेळ का आली? तर, त्यास काही कारण आहेत आणि तशी पार्श्वभूमीही. युक्रेनचा नकाशा जर आपण बघितला, तर युक्रेन हा युरोप व रशियाच्यामध्ये एका सीमेचे काम करतो. पण जेव्हा पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली आणि युक्रेन सोव्हिएत युनियनला जाऊन मिळाला तेव्हा खऱ्या अर्थाने ही सीमा संपुष्टात आली.

हेही वाचा । काय आहे चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’?

● यासाठी खालील घटना महत्वाच्या ठरतात.

1) त्यावेळी रशिया हा शेतीप्रधान देश होता आणि युक्रेनमध्ये बऱ्यापैकी औद्योगिकीकरण झाले होते. त्यावेळी, म्हणजेच वर्ष 1929 ते 1933 च्या दरम्यान रशियाचे अध्यक्ष स्टालिन यांनी युक्रेनच्या लोकांचे मध्य रशियात स्थलांतर केले व रशियातील लोकांचे युक्रेनमध्ये.
2) दुसरीकडे, क्रिमिया हा आधी रशियाचा भाग होता, पण तो युक्रेनच्या भूपट्टाचा भाग होता. त्यामुळे युक्रेनचा विकास व्हावा यासाठी रशियाचे अध्यक्ष निकिता क्रिष्याव यांनी तो भूभाग 1954 मध्ये युक्रेनला दिला.

त्यानंतर, जेव्हा 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि युक्रेनने स्वतंत्र देशाच्या बाजूने मतदान केले, तेव्हा युक्रेनमध्ये दोन प्रकारचे वर्ग तयार झाले. एक म्हणजे युरोपच्या बाजूने, तर दुसरा रशियाच्या बाजूने. युरोपच्या बाजूने जो गट होता त्याचे नेतृत्व करत होते व्हिक्टर युशेंको आणि जो गट रशियाचे समर्थन करत होता त्याचे नेतृत्व होते व्हिक्टर यानाकोविच यांच्या हाती. ज्यावेळी 2004 मध्ये युक्रेनमध्ये निवडणूका झाल्या, तेव्हा रशियाचे खंदे समर्थक व्हिक्टर यानाकोविच यांचा विजय झाला. मात्र कालांतराने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले व त्यामळे त्यांचे सरकार पडले. त्यानंतर झालेल्या 2005 च्या निवडणुकीत व्हिक्टर युशेंको यांचा विजय झाला, पण त्यांच्या कार्यकाळात युक्रेनची अर्थव्यवस्था कोसळली. या परिस्थितीचा अप्रत्यक्ष फायदा व्हिक्टर यानाकोविच यांना होऊन ते सत्तेवर परतले.

● युक्रेन-रशिया वाद कसा सुरू झाला?

खरंतर, त्यावेळी युक्रेनची अर्थव्यवस्था कोसळण्यामागे खरे कारण होते ‘नैसर्गिक वायू’. रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायुचे साठे आहेत. पण युरोपियन देश प्रत्यक्षरीत्या रशीयाकडून नैसर्गिक वायू विकत घेत नाही. त्यामुळे रशिया नैसर्गिक वायू युक्रेनला देतो व युक्रेन ते युरोपीय देशांना विकतो. त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूवर अवलंबून होती व जेव्हा रशियाने युक्रेनला नैसर्गिक वायू देणे बंद केले, तेव्हा अर्थव्यवस्था कोसळली.आता निवडून आलेले व्हिक्टर यानाकोविच यांच्यावर अर्थव्यवस्था सुधारण्याची जबाबदारी होती, त्यासाठी त्यांनी रशियाकडून आर्थिक मदत घेतली. त्याविरोधात युक्रेनमध्ये मोर्चे सुरू झाले व ते दिवसेंदिवस ते मोठे होत गेले. यानाकोविच यांनी प्रदर्शनकारी लोकांवर युक्रेनच्या आर्मीला गोळीबाराचे आदेश दिले आणि त्यात बरेचसे लोक मरण पावले. दुसऱ्याच दिवशी यानाकोविच युक्रेन सोडून पळून गेले आणि खरी समस्या येथून सुरू झाली.

स्रोत : The Global State

रशियाने वरील संधीचा फायदा घेऊन युक्रेनमधील रशियन लोकांच्या संरक्षणाचे कारण देऊन आपली आर्मी तिथे पाठवली आणि 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केला. पण रशियाकडून एवढा मोठा भूभाग असताना, त्याला क्रिमिया का पाहिजे? तर याचे कारण आहे रशियाला लाभलेला जगतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा. पण हा समुद्रकिनारा संपूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत आहे आणि क्रिमिया हस्तगत केल्याने रशियन नौदलाला गरम पाण्याचे पोर्ट उपलब्ध झालेले आहे. ते रशियाच्या संरक्षण, डावपेच व व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळेच रशियाने क्रिमियावर कब्जा केला. 

नक्की वाचा । सीमावादातील मध्यस्थिंनी ताण वाढविणारी कृती टाळावी : संयुक्त राष्ट्र

आजही रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये आहे. आता पुतीन यांना वाटले तरी ते ती त्यांच्या सैन्याला मागे बोलवू शकत नाही. त्यातच  क्रिमियावर रशियाने मिळवलेल्या ताब्यामुळे युक्रेन आता नाटो किंवा युरोपीय संघाला जाऊन मिळेल यातही अशी शंका निर्माण होणेही चुकीचे नाही.

स्रोत : The Telegraph

आता प्रश्न हा आहे की, इतकी संवेदनशील परिस्थिती असताना रशियायी नौदलाने युक्रेनच्या नौदलावर हल्ला का केला? विशेष म्हणजे, त्याच दिवशी जी-२० ची बैठक होती! आणि त्यानंतर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उभा राहिला. आता जी-२० ची बैठक असताना हल्ला करावा इतका तर रशिया मूर्ख नाही आणि यातून उलट फायदा रशियाला नसून युरोपीय देशांना आहे. तरीही, हल्ला कोणीही केला असो, पण आता युक्रेन व रशियाचे सैन्य मात्र आमोरासमोर उभे राहिले आहेत, हे मात्र तितकेच खरे.

 

लेख : चैतन्य सुभाष जाधव

ई-मेल : chaitanyajadhav2017@gmail.com

ट्विटर : @KaweriChaitanya 

 

(लेखक आंतरराष्ट्रीय संबंधांचे आणि  जागतिक घडामोडींचे नव-अभ्यासक आहेत.)


(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: