जग मार्ग भरकटले, हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले; संयुक्त राष्ट्रांची धोक्याची घंटा!

वृत्तसंस्था । रॉयटर्स

ब्रेनवृत्त । जिनेव्हा


सन 2020 मध्ये जगभरातील हरितगृह वायूंच्या प्रमाणाने एक नवी विक्रमी पातळी गाठली असल्याचे संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेने आज (सोमवारी) सांगितले. तसेच, वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठीचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गापासून जग भरकटले (way off track) आहे, असेही हवामान संबंधीच्या सर्वोच्च संस्थेने म्हटले आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या (WMO : World Meteorological Organization) अहवालात असे दिसून आले आहे, की सन २०२०मध्ये कार्बन डायऑक्साईडची जागतिक पातळी 413.2 भाग प्रति दशलक्ष (PPM) इतकी वाढली आहे. कोव्हिड-१९ च्या टाळेबंदी काळात उत्सर्जनात तात्पुरती घट झाली असली, तरी 2020 मधील हे प्रमाण गेल्या दशकातील कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे.

संघटनेचे महासचिव पेटेरी तालस यांनी सांगितले, की उष्माग्राही वायूंच्या वाढीच्या सध्याच्या दरामुळे येत्या काळात तापमान २०१५ च्या पॅरिस करारांतर्गत निश्चित केलेल्या पातळीपेक्षा “कितीतरी जास्त” दराने वाढेल. २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस करारानुसार, या शतकातील तापमान वाढ पूर्व-औद्योगिक काळातील सरासरी तापमान वाढीपेक्षा फक्त 1.5 अंश सेल्सिअस जास्त असावी, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

तीव्र तापमानामुळे दरवर्षी होतात ५० लाखांहून अधिक मृत्यू

> आपण मार्गच भरकटलोत : महासचिव पेटेरी तालस

तालस म्हणाले, “तापमान वाढ नियंत्रित करण्याच्या मार्गापासून आपण दूर जात आहोत. आपल्याला आपल्या औद्योगिक, ऊर्जा आणि वाहतूक प्रणालीचा तसेच पूर्ण जीवनपद्धतीचा पुन्हा सखोल आढावा घेण्याची गरज आहे.” येत्या 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल (COP26) परिषदेत राष्ट्रांच्या वचनबद्धतेत “नाट्यपूर्ण वाढ” केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले.

पॅरिस करारांतर्गत वैश्विक तापमान वाढीचा (Global Warming) सामना करण्यासाठीच्या कृती मजबूत करण्याच्या उद्देशाने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे जवळपास 200 देशांच्या प्रतिनिधींची ३१ तारखेपासून परिषद आयोजित होणार आहे.

पर्यावरण विषयक बातम्यांसाठी क्लिक इथे करा >>> पर्यावरण

>  काय सांगतो जागतिक हवामान संघटनेचा अहवाल 

जिनेव्हास्थित जागतिक हवामान संघटनेच्या वार्षिक अहवालात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडच्या वातावरणीय संहतीचे (Concentration) मोजमाप केले जाते. हे वायू पृथ्वीला अधिक उबदार करतात आणि उष्णतेच्या लाटा (heatwaves) व अतिपर्जन्य यांसारख्या अत्यंत गंभीर   घटनांना चालना देतात.

 सोबतच, अपेक्षेप्रमाणे अहवालाने हीसुद्धा पुष्टी केली आहे, कोव्हिड-१९मुळे ओढवलेल्या आर्थिक मंदीचा “हरितगृह  वायूंच्या वातावरणातील पातळी आणि त्यांच्या वाढीच्या दरावर कोणताही लक्षणीय परिणाम झाला नाही.” उलट, तापमान वाढीसाठी अतिशय घातक असलेल्या कार्बन डायऑक्साइडची पातळी २०२१ मध्येही वाढतच गेली आहे. हवामान शास्त्रज्ञ म्हणतात, की तापमानवाढीचा कल सद्यातरी कायम राहील, कारण मागील शतकांतील कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन अजूनही वातावरणात कायम आहे.

ब्रेनबिट्स : राष्ट्रीय हायड्रोजन अभियान (नॅशनल हायड्रोजन मिशन)

दुसरीकडे, अहवालामध्ये महासागर आणि जमिनीच्या अंदाजे निम्मे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन शोषून घेण्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान आणि इतर घटकांमुळे महासागराचा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन शोषून घेण्याचा वेग कमी होऊ शकतो.

(पुनर्लेखन, भाषांतरण व संपादन :  सागर बिसेन )

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: