‘यूपीएससी’ने ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा’ तूर्तास पुढे ढकलली
‘कोव्हिड-१९’ च्या पार्श्वभूमीवर आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत संघ लोकसेवा आयोगाने ३१ मे २०२० रोजी नियोजित ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२०’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनचा कालावधी परत एकदा १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यशासनांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दरम्यान, २०२० ची ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा’ देखील पुढे ढकलण्याचा निर्णय ‘संघ लोकसेवा आयोग’ने (युपीएससी) घेतला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज (ता. ४) आयोगाने हा निर्णय घेण्यात आला.
नियोजित वेळापत्रकानुसार येत्या ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, लॉकडाऊनचे निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढून ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२०’ पुढे ढकलली जात असल्याचा निर्णय घेण्यात आला. पण ही परीक्षा कधी याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
आगामी २० मे रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख वेसबाइटवर जाहीर केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे. नवीन तारीख ठरवल्यानंतर उमेदवारांना याबाबत कळविले जाईल. अर्थात, परीक्षेची नेमकी तारीख अजून स्पष्ट नाही. पण उमेदवारांना सोयीचे होईल अशाप्रकारे, पुढील तारीख जाहीर करण्याच्या दिनांकापासून एक महिन्याचा कालावधी परीक्षार्थींना देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ५५३ वर पोहचली आहे. या दृष्टीने वाढता धोका लक्षात घेऊन अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सोबतच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांकडून एनओसी मिळालेली नाही. प्रत्येक राज्यात परीक्षेसाठी केंद्र ठरलेली असतात. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन परीक्षेच्या तयारीसंबंधीचा अहवाल युपीएससीला देते. पण लॉकडानमुळे राज्यांची तयारी झालेली नसल्याने आयोगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
◆◆◆