जेष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन!
ब्रेनवृत्त | पुणे
योग व आयुर्वेदाचे प्रख्यात अभ्यासक आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या तब्येतीत बिघाड आल्याने गेल्या आठवड्यात त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, योग, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा अनेक वर्षे प्रचार प्रसार केला. आयुर्वेदिक औषधोपचार यांबाबत ते विविध माध्यमांतून प्रबोधन करत होते. तसेच नवी पिढी सुदृढपणे जन्माला यावी म्हणून त्यांनी ‘गर्भसंस्कार’ नावाच्या पुस्तकाचेही लेखन केले आहे. त्यांच्या या पुस्तकाचे विविध भाषांमधून भाषांतर झाले आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गिलोय आणि अश्वगंधा कोरोनाची साखळी तोडण्यात 100 टक्के प्रभावी
बालाजी तांबे हे ‘आत्मसंतुलन व्हिलेज’चे संस्थापक आहेत. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलेे असल्याच्या भावना सगळीकडून व्यक्त केल्या जात आहेत.
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आता सर्वांसाठीच !
राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बालाजी तांबे यांनी श्रद्धांजली वाहताना ट्विटले आहे, “आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. माझा त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.”
आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.