विहिंप कार्यध्यक्षांची काँग्रेस समर्थनाच्या वक्तव्यावरून माघार

येत्या निवडणुकांमध्ये जर काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट करणार असेल, विश्व हिंदू परिषद काँग्रेसला पाठिंबा देईल, असे वक्तव्य विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले आहे. 

 

नवी दिल्ली, २० जानेवारी

पूर्ण पाच वर्षे बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नसल्यामुळे विश्व हिंदू परिषद भाजपवर नाराज असल्याचे दिसते. भाजपाच्या राम मंदिराबाबतच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच की काय तर, येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात जर राम मंदिर मुद्याचा समावेश केला, तर विश्व हिंदू परिषद काँग्रेसला जाहीर पाठींबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी याबाबत त्यांची परिषदेची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, ”राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले, त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. जर काँग्रेस राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करणार असेल, तर आम्ही काँग्रेलाही पाठिंबा देण्याबाबत विचार करू.” सोबतच, काँग्रेसने आरएसएस स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी, असे आव्हानही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केले आहे.

दरम्यान, विहिंपकडून करण्यात आलेले हे वक्तव्य भाजपासाठी धक्का असल्याचे समजले जात आहे. राम मंदिर बांधण्याबाबत विश्व हिंदू परिषदेचा भाजपावरचा विश्वास हळूहळू कमी होत असल्याच्या चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

नुकत्याच, हाती आलेल्या बातमीनुसार आलोक कुमार यांनी वर केलेल्या त्यांच्या विधानापासून यु-टर्न घेतला आहे. माझ्या वक्तव्याला ताणून घेण्यात आले आहे आणि आमचा काँग्रेसला कधीही पाठिंबा नसेल, असे आलोक कुमार म्हणाले आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: