प्रतिजन आणि प्रतिपिंड चाचणी म्हणजे नक्की काय ?
‘कोव्हिड-१९’चे मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यात सध्या दिवसाला 25 हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात रुग्ण दुप्पटीचा वेग 30 दिवसांवर गेला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर 55 टक्के आहे. दरम्यान, ‘कोव्हिड-१९’चा वेगाने होत असलेला प्रसार बघता राज्य शासनाने कोरोनाची जलद तपासणी करण्यासाठी प्रतिजन चाचणी (Antigen Test) आणि प्रतिपिंड चाचणी (Antibodies Test) करण्याचे ठरवले आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, की या चाचण्या म्हणजे नक्की काय आहेत? त्या कशा केल्या जातात? याबाबतच आज सविस्तर जाणून घेऊया.
सध्या देशात ‘कोव्हिड-१९‘ प्रसार वेगाने होत आहे. दिवसेंदिवस सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढत आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे व औरंगाबाद या शहरांची अवस्था बिकट होत चालली आहे. ‘कोव्हिड-१९’चे मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यात सध्या दिवसाला 25 हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्यात रुग्ण दुप्पटीचा वेग 30 दिवसांवर गेला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर 55 % आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने कोरोनाची जलद तपासणी करण्यासाठी प्रतिजन चाचणी (Antigen Test) आणि प्रतिपिंड चाचणी (Antibodies Test) या दोन चाचण्यांना परवानगी दिली आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना केली होती. आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनेही (आयसीएमआर) अँटीजेन आणि अँटीबॉडी चाचण्या करण्यासाठी राज्यांना परवानगी दिली आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, की या चाचण्या म्हणजे नक्की काय आहेत? त्या कशा केल्या जातात? याबाबतच आज सविस्तर जाणून घेऊया.
● प्रतिजन (अँटिजेन) म्हणजे काय?
हवेतील विषाणूंच्या संसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने तयार होतात. हे पदार्थ अथवा प्रथिने रुग्णाच्या शरीरात प्रतिपिंडे (Antibodies) तयार करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करतात, या पदार्थांनाच ‘प्रतिजन’ (Antigen) असे म्हणतात. रुग्णाच्या श्वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर हे प्रतिजन आहेत की नाही, याची माहिती प्रतिजन चाचणीतून मिळते. अर्थात, यासाठी विषाणूंचा संसर्ग कधी झाला, त्याचे नमुने कसे घेतले यावर या चाचणीचे निदान अवलंबून असते.
● प्रतिजन चाचणी कशी केली जाते ?
हवेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर प्रतिजने असतात. हा घटक शरीरातला नसल्याने मानवी शरीर या प्रतिजनांना बाहेरून आलेला घटक (फॉरेन बॉडी) असे संबोधले जाते. त्यावर मानवी रक्ताच्या पेशीतले पांढऱ्या रक्तपेशी (Lymphocytes) नावाचे घटक प्रतिपिंडांची (अँटीबॉडीज) तयार करतात. या अँटीबॉडीजचा आकार हा त्या अँटीजेन्सना स्वतःमध्ये सामावून घेणारा किंवा त्यांना आपल्याशी जोडून घेणारा, अशा पद्धतीचा असतो.
या रक्तपेशींनी निर्माण केलेली प्रतिपिंडे हवेतून शरीरात आलेल्या विशिष्ट विषाणूंचा प्रतिकार करतात. तसेच त्या विषाणूंच्या प्रतिजनांना जोडल्या जाऊन दुसरीकडे नेतात. या प्रक्रियेमुळे मानवी शरीरात बाहेरून आलेल्या विषाणूची मोठ्या प्रमाणात होणारी निर्मिती थांबते आणि शरीरात त्याचा जास्त संसर्ग होत नाही. प्रतिपिंडांना जोडल्या गेलेल्या विषाणूंच्या अंटीजेन्सना संपवण्याचं काम ‘फॅगोसाइट्स प्रक्रिये’द्वारे केेले जाते.
● ‘फॅगोसायटोसिस प्रक्रिया’ (Phagocytosis Process) म्हणजे ?
फॅगोसायटोसिस प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक म्हणजेच ‘फॅगोसायट्स’ (Phagocyte) अथवा शरीरात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा नाश करणारा रक्तातील एक प्रकारचा श्वेत गोलक. फॅगोसाईट हा अमोनिया किंवा पांढऱ्या रक्त पेशीसारख्या शरीराच्या पेशींपैकी एक मुक्त कोशिकायुक्त जीव असतो. या पांढऱ्या रक्त पेशी विषाणूंच्या प्रतिजनांशी जोडल्या गेलेल्या प्रतिपिंडांना गिळून टाकतात. पांढऱ्या रक्त पेशींमध्ये असणारे विकर (Enzymes) हे काम करतात.
‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना
● प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) म्हणजे काय ?
प्रतिपिंड (Antibody) शरीरातील असं तत्त्व आहे, ज्याची निर्मिती आपली रोगप्रतिकार शक्ती प्रणाली (इम्यून सिस्टिम) करते. खरंतर व्यक्ती जेव्हा कुठल्याही विषाणूच्या संपर्कात येतो, तेव्हा शरीराच्या रक्तात आणि उतीमध्ये असणारे प्रतिपिंड तयार होऊ लागते. ही प्रतिपिंडे म्हणजे प्रथिने (प्रोटीन्स) असतात, जे विषाणूला शरीरात पसरण्यापासून थांबवतात.
● प्रतिपिंड चाचणी (अँटीबॉडी टेस्ट) कशी केली जाते ?
या चाचणीत घशातील नमुना (थ्रोट स्वॅब) घेतला जातो आणि त्यानंतर अवघ्या एक तासात त्याचा अहवाल (Report) मिळतो. अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी प्रतिपिंडे (Antibodies) तयार झालेली असतात. त्या प्रतिपिंडांची तपासणी ही या चाचणीत केली जाते.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्य शासनाने यासाठी निविदा काढली आहे. दक्षिण कोरियाच्या बायोसेन्सर्स कंपनीने ही टेस्ट बनविली आहे. फ्रंटलाईन वर्कर्सवर ही टेस्ट करणार आहोत. याची किंमत 450 रुपये आहे. एक लाख टेस्ट करणार आहोत, तसंच इतर व्यक्तींवरसुद्धा ही टेस्ट करता येईल. प्रत्येक जिल्ह्यात ही टेस्ट केली जाणार आहे.” तसेच, राज्यातील काही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (कंटेन्मेंट झोन) रुग्ण वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा ठिकाणी एखाद्याला संसर्ग होऊन गेला आहे की नाही, हे तपासण्यासाठी प्रतिपिंड चाचणी करता येईल, असेही ते म्हणाले.
ब्रेनविशेष | ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ आणि ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’
● जलद चाचण्यांचे महत्त्व
– विलगीकरण, समूह संसर्ग तपासणी (Contact and Community Tracing) जलद करणे शक्य होणार
– प्रतिपिंड चाचणीमध्ये रुग्ण बाधित आढळल्यास त्यांची परत चाचणी करण्याची गरज नाही.
– देशात अँटीजेन आणि आरटी-पीसीआर अशा दोनही चाचण्यांची आवश्यकता आहे.
– वेळ आणि पैशाची बचत.