‘पीएम-किसान पोर्टल’ म्हणजे नेमकं काय?

केंद्र शासनाने नुकत्याच संसदेत मांडलेल्या शेवटच्या व हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना’ जाहीर केली आहे. संबंधित योजने विषयीची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती व्हावी म्हणून शासनाने ‘पीएम-किसान’ हे पोर्टल सुरू केले आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर...

 

मराठीब्रेन | ब्रेनबिट्स 

सागर बिसेन (@sbisensagar )

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना’ असे या आर्थिक मदत योजनेचे नाव असून, या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना या योजनेची पुरेपूर माहिती मिळावी म्हणून केंद्र शासनाने ‘पीएम-किसान’ नावाचे स्वतंत्र माहितीदालन(पोर्टल) सुरू केले आहे.  या पोर्टलचे संकेतस्थळ www.pmkisan.nic.in हे आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना योजने विषयीची सर्व माहिती वेळोवेळी प्राप्त होईल. सोबतच आपले नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहे की नाही, हेही घरी बसून तपासता येईल.

 

शेतकरी सन्मान निधी योजना 

१. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या हंगामी अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून ‘शेतकरी सन्मान निधी योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात एकूण ७५००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

३. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी प्रत्येकी दोन हजार रुपये अशाप्रकारे तीन टप्प्यांत जमा होणार आहे. पाहिल्या टप्प्याचा निधी मार्च महिन्यात होण्याचे अपेक्षित आहे.

४. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व आचारसंहितेला लक्षात ठेवून ह्या योजनेचा शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यावर शासनाचा भर असणार आहे.

५.  सर्वप्रथम या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रत्येक राज्याला केंद्राकडे पाठवावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

६. ही यादी शासनाकडे पोहचल्यानंतर शेतकरी आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे पोर्टलवरून थेट तपासू शकतील.

 

● योजनेसाठी कोण पात्र असतील?

१. ज्या शेतकऱ्यांकडे दोन किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी मापाची जमीन आहे अशा लहान व सीमावर्ती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र यातील काहींना, जे विविध व्यवसायात मोडतात अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

२. ज्या शेतकरी कुटुंबातील एक किंवा एकापेक्षा अधिक सदस्य कर भरतात व शासकीय नोकरीत आहेत, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

३. ज्या कुटुंबात किमान एकतरी व्यक्तीकडे मासिक निवृत्तीवेतन ₹१०,००० येत असेल अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

४. ज्या कुटुंबातील लोक डॉक्टर, अभियंता, वकील व अशा इतर नोकरींमध्ये आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

● ‘पीएम-किसान’ पोर्टल

१. शेतकरी सन्मान निधी योजनेसबंधीची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करवून देण्यासाठी या ई-दालनाची सुरुवात करण्यात आली आहे.

२. या पोर्टलचे संकेतस्थळ www.pmkisan.nic.in हे असून यावर शेतकऱ्यांना वेळोवेळी योजनेतून मिळणाऱ्या निधीसंबंधी अद्ययावत माहिती जाणून घेता येईल.

३. आपले नाव योजनेत आहे की नाही, हेही या पोर्टलच्या मदतीने तपासून घेता येईल.

४. विविध राज्यांनी त्यांच्या-त्यांच्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांची पाठवलेली यादी(माहिती) या पोर्टलवर उपलब्ध असेल.

दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्ष योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळल्यावर योजने यशस्वी झाली असे म्हणता येईल. आगामी लोकसभा निवडणूक व त्यामुळे लागणार आचारसंहिता लक्षात ठेवता शासन लवकरात लवकर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल. योजनेचा पहिला टप्पा प्रत्यक्ष कधी सुरू होईल हे जाहीर नसले, तरी मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील निधी जमा होण्याच्या शक्यता आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्री राधामोहन सिंह यांनी राज्यांना याविषयी लवकरात लवकर सहकार्य करून ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० जमा करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: