सावध व्हा! बनावट कोव्हीशिल्ड कशी ओळखाल?
ब्रेनवृत्त | पुणे
आफ्रिका व दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील अनेक देशांमध्ये कोव्हिड-१९ आजारावरील कोव्हीशिल्ड लसीच्या बनावट आवृत्ती आढळत आहेत. त्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना सावधतेचा इशारा दिला असून, खऱ्या कोव्हीशिल्ड लसीचा उपयोग अधिकृत राष्ट्रीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखालीच करण्यात यावा असे म्हटले आहे.
“जुलै आणि ऑगस्ट २०२१ मध्ये कोव्हीशिल्ड लसीच्या बनावट आवृत्ती आढळल्याच्या तक्रारी डब्ल्यूएचओकडे आल्या होत्या. कोव्हिशिल्डच्या अधिकृत निर्मात्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) आम्हाला पटवून दिले आहे, की संबंधित लसी बनावट आहेत. ह्या खोट्या लसी सर्वांत आधी भारत आणि युगांडामध्ये रुग्ण पातळीवर (म्हणजेच प्रत्यक्ष लस देण्याआधी) आढळल्या आहेत”, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले.
सिरम इन्स्टिट्यूटद्वारे अमेरिकेतील अस्त्राझेनका-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिड-१९ लसीची ‘कोव्हीशिल्ड (CoviShield)’ या ब्रँड नावाने भारतात विक्री केली जाते. सद्या भारतात सुरू असलेल्या १८ वर्षे व पुढील वयोगटातील लोकांच्या कोव्हिड-१९ लसीकरणात खऱ्या कोव्हिशिल्ड लसीचा उपयोग सुरू आहे. “खऱ्या लसीचा वापर फक्त राष्ट्रीय औषधे नियामकाच्या अधिकृत मार्गदर्शनाखालीच व्हावा”, असे डब्ल्यूएचओ सर्व संबंधित देशांना बजावले आहे.
बनावट कोव्हिशिल्ड लसीच्या वापराने अतिशय विपरीत परिणाम होण्याची शक्यता डब्ल्यूएचओ व सिरम संस्थेने वर्तवली आहे. “बनावट लसीमुळे जागतिक आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि आधीच संकटात असलेल्या जनमानसावर वाढीव संकट ओढवू शकते. त्यामुळे अशा बनावटी उत्पादनांची ओळळ पटवून व त्यांना वितरणातून बाद करणे अत्यावश्यक आहे”, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
वाचा | जॉन्सन व जॉन्सनची लस ठरली पाचवी मान्यताप्राप्त लस!
● कशी आहे बनावट कोव्हीशिल्ड लस?
बनावट लस निर्मात्यांनी जाणूनबुजून किंवा खोटेपणाने लसीची ओळख, संरचना व स्त्रोत चुकीचे प्रदर्शित केले आहेत. याच आधारावर निदर्शनास आलेल्या लसी बनावट असल्याचे सिरम व डब्ल्यूएचओने ठरवले.
संघटनेला आढळलेल्या लसींवर बॅच 4121Z040 व अंतिम दि. १० ऑगस्ट २०२१ असे नमूद केले आहे, जे खोटे आहे. सोबतच, या कोव्हीशिल्ड लसीच्या कुपीवर आकारमान २ मिलीलीटर असे लिहिले आहे. प्रत्यक्षात उत्पादकांनी कोव्हीशिल्डच्या २ मिलीलीटर क्षमतेच्या (४ गुटींसाठी) शिशाच्या तयार केलेल्या नाहीत.
हेही वाचा | जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!
परिणामी, ज्या ज्या देशांमध्ये अथवा भागांमध्ये या बनावट लसी आढळल्या आहेत, त्या क्षेत्रांमध्ये लस पुरवठा साखळीत अत्याधिक दक्षता घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. “रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्र, घाऊक विक्रेते, वितरक, औषधालये आणि इतर कोणत्याही प्रकारच्या लस पुरवठा यंत्रणेत दक्षता वाढवण्यात यावी”, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे.
सहभागी व्हा👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in