सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी बंधनकारकच : डब्ल्यूएचओच्या सुधारित मार्गदर्शक सूचना

ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा ज्या ठिकाणी विषाणू जास्त पसरलेला आहे आणि शारीरिक अंतर पाळणे शक्य नाही अशा ठिकाणी फेसमास्क वापरलेच पाहिजे, असे या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

 

ब्रेनवृत्त | जिनेव्हा

शारीरिक अंतर पाळणे शक्य नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी (Face Mask) वापरलीच पाहिजे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिला आहे. डब्ल्यूएचओने ‘कोव्हिड-१९‘च्या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा ज्या ठिकाणी विषाणू जास्त पसरलेला आहे आणि शारीरिक अंतर पाळणे शक्य नाही अशा ठिकाणी फेसमास्क वापरलेच पाहिजे, असे या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये सर्वत्र कोरोना विषाणूच्या साथीचा आजार पसरला. त्यानंतर जगभरातील सुमारे २१२ हून अधिक देशांत या साथीच्या रोगाने कहर माजवला आहे. या रोगापासून बचाव होण्यासाठी डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसिस अधानोम यांनी शनिवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, जगभरातील सर्व  केंद्र शासनांनी सर्वसामान्य नागरिकांना मुखपट्टी वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. समुह संसर्गाच्या भागात, जिथे शारीरिक अंतर पाळणे कठीण आहे, त्याठिकाणी ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनी फेसमास्क घातलाच पाहिजे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. “परंतु, केवळ फेसमास्क कोरोना विषाणूपासून संरक्षण करणार नाही, तर शक्य असल्यास लोकांनी सार्वजनिक  ठिकाणी जाण्याचे टाळणेदेखील तितकेच महत्त्वाचे  आहे”, असा सल्लाही संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य केंद्राने  दिला आहे.

हेही वाचा : चौथ्या टाळेबंदीत महत्त्वाची ठरतील शासनाची ९ मार्गदर्शक तत्त्वे

तसेच, जे लोक कोरोना विषाणूसदृश लक्षणांनी आजारी आहेत त्यांनी घरीच राहाणे आवश्यक आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांनी घराच्या बाहेर पडताना वैद्यकीय फेसमास्क घालावा, असेही डब्ल्यूएचओने आपल्या मागर्दर्शक सूचनेत म्हटले आहे.  त्याचप्रमाणे, घरातच संक्रमित व्यक्तीची काळजी घेणाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या खोलीत प्रवेश करताना फेसमास्क घालावा. तसेच संक्रमित रुग्णावर उपचार करणाऱ्या  आरोग्य कर्मचार्‍यांनी वैद्यकीय मुखवटे तसेच संरक्षक उपकरणे परिधान करावेत.  तसेच, केवळ रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच नव्हे, तर संक्रमणाचा धोका अधिक असलेल्या भागात, आरोग्य विभागात काम करणाऱ्या आणि आरोग्य सुविधा देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  फेस्मास्क वापरलेच पाहिजेत, अशी शिफारस आरोग्य संघटनेने केली आहे.

“सध्या आपल्याकडे या महामारीच्या काळात शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ करण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. त्याचबरोबर, फॅब्रिक मास्क घालणे हे मुख्यतः ते घालणाऱ्याचे संरक्षण करण्यापेक्षा दुसऱ्याला बाधित होण्यापासून रोखण्यासाठी घालायचे आहे”,  असे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, डब्ल्यूएचओने सामान्य लोकांसाठी ‘विना-वैद्यकीय कापडी मुखपट्टी’च्या (Non-Medical Fabric Mask) रचनेबद्दल नवीन मार्गदर्शक सूचनादेखील प्रकाशित केल्या आहेत. त्यामध्ये मास्कचे कमीतकमी तीन थर वेगवेगळ्या सामग्रीचे असावेत, असे म्हटले आहे. यामध्ये फेसमास्कचा आतील थर कापसासारख्या पाणीशोषक सामग्रीचा बनलेला असावा. फिल्टर म्हणून कार्य करणाऱ्या पॉलीप्रॉपिलिनसारख्या सामग्रीपासून मधला थर बनलेला असावा, तर बाहेरचा थर पाण्यापासून बचाव करणाऱ्या पॉलिस्टरसाखा असावा, असे यात सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: