कोण होणार कुस्ती महासंग्रामाचा जेता?

‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल २०१८’ मध्ये आज रंगणार कुस्तीचा महामुकबला . दुसरी पात्रता फेरी : पुणेरी उस्ताद विरुद्ध विदर्भाचे वाघ, आज सायं. ६:०० वाजता आणि अंतिम सामना रात्री ८:०० वाजेपासून.

 

मराठीब्रेन वृत्त

पुणे, १८ नोव्हेंबर

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल २०१८’ च्या महासंग्रामात आज कोण इतिहास घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महामुकाबल्याची दुसरी पात्रता फेरी पुणेरी उस्ताद आणि विदर्भाचे वाघ यांच्यात आज सायं. ६ वाजता होणार असून, आजच रात्री ८ वाजता कुस्तीच्या महासंग्रामाचा अंतिम सामनाही होणार आहे. यशवंत सातारा संघाने कालच थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला.

कुस्तीच्या महासंग्रामात जेतेपदासाठी लढण्यास सज्ज आहेत यशवंत सातारा, पुणेरी उस्ताद आणि विदर्भाचे वाघ

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल २०१८’ ची आज सांगता होणार आहे. आज सायंकाळी होणाऱ्या दुसऱ्या बाद फेरीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या अंतिम सामान्यकडे सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून आहे. कुस्तीच्या या महासंग्रामात बलाढ्य ठरलेल्या यशवंत सातारा संघाने काल पुणेरी उस्तादांना आखाड्यात चित करून ‘पहिली पात्रता फेरी’ जिंकत थेट अंतिम सामन्यात मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे, सुरुवातीपासूनच प्रत्येक खेळीत चिकाटीने झुंज देत लढणाऱ्या विदर्भाच्या वाघांनी मुंबई शस्त्र संघाला हरवत दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला आहे.

आज सायंकाळी ६ वाजता विदर्भाचे वाघ आणि पुणेरी उस्ताद यांच्यामध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी दुसऱ्या पात्रता फेरीची लढत होणार आहे. ही पात्रता फेरी जिंकणारा संघ यशवंत सातारासोबत आजच रात्री ८ वाजता अंतिम सामना खेळेल.

 

‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल २०१८’ ला ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर २ नोव्हेंबरला सुरूवात झाली होती. या कुस्तीसंग्रामत संपूर्ण महाराष्ट्रातील विभागीय स्तरावर सहा संघांचा समावेश आहे. मात्र, यांपैकी गुणतालिकेनुसार वरच्या चार संघांची बाद व पात्र फेरीसाठी निवड झाली होती. वीर मराठवाडा आणि कोल्हापुरी मावळे ह्या संघांनीही चांगली खेळी प्रदर्शित केली. मात्र त्यांना अंतिम चार संघांत प्रवेश मिळवता आला नाही.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलची अंतिम गुणतालिका

आतापर्यंतच्या खेळींचा आढावा घेता कुस्तीच्या या महासंग्रामात ‘यशवंत सातारा‘ संघाची कामगिरी उत्तम राहिली असून, सातारा संघ बलाढ्य ठरला आहे. या संघाने थेट अंतिम फेरीतही प्रवेश गाठला. यामुळे या बलाढ्य संघाला चित करण्यास कोण समोर येणार यासाठी दुसऱ्या पात्रता फेरीकडे कुस्तीरसिकांचे लक्ष वेधून आहे. दुसरीकडे ‘पुणेरी उस्ताद‘ संघात विक्रमी खेळाडूंचा भरणा असल्याचे ते कधी बाजी मारतील याची शाश्वती नाहीच. आतापर्यंतच्या सामन्यांतील खेळींना बघून पुणेरी संघ चपळ असल्याचेच कळते. आजच्या पात्रता फेरीत या पुणेरी संघाला सर्वात मोठे आव्हान पेलावे लागणार आहे ते ‘विदर्भाचे वाघ‘ संघाचे. महामुकाबल्याच्या सुरुवातीपासूनच वाघांची खेळी चिकाटीची राहिली आहे. नावाप्रमाणेच या संघाने कितीतरी हातून जाणारे सामने जिंकले आहेत वा मग बरोबरीत सोडवले आहे. सोबतच या संघाला चाहत्यांचाही भरपूर प्रतिसाद असल्याचे दिसते. दुसऱ्या पात्रता फेरीपर्यंत पोहचण्याचा विदर्भाच्या वाघांचा प्रवास जिद्दीचा राहिल्याचे दिसते. पुणेरी संघाला हे आव्हान पेलणेही तेवढे सोपे नसेल.

आजचा अंतिम सामनाच या कुस्ती महासंग्रामाचा इतिहास कोण ठरविणार हे निश्चित करेल. यशवंत सातारा हा बलाढ्य संघ, विजय चौधरी सारखा पुणेरी उस्ताद आणि विदर्भाचा मार्ग्यारियन वॉल्टर हा वाघ हे आजच्या महामुकाबल्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: