‘आत्मनिर्भर भारत’साठी वाइल्डक्राफ्टचा भारतीय लष्कराशी करार
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत योजने‘ला हातभार लावण्यासाठी पिशव्या बनवणाऱ्या ‘वाइल्डक्राफ्ट’ या स्वदेशी कंपनीने भारतीय लष्कराबरोबर एक मोठा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून भारतीय लष्कराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्याबरोबरच या माध्यमातून कंपनीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपर्यंत नेण्याचा उद्देश आहे. त्यासाठी, वाइल्डक्राफ्टने आता नायकी, अदिदास, रीबॉक, प्युमा यांसारख्या विदेशी ब्रॅण्ड्सला मागे टाकण्याची तयारी केली आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक गौरव डबलिश आणि सिद्धार्थ सूद यांनी नुकतीच दिली आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
हेही वाचा : जर्मन कंपनी ‘वॉन वेल्क्स’ आपले उत्पादन चीनमधून भारतात हलविणार
वाइल्डक्राफ्टला मिळालेल्या ऑर्डरनुसार कंपनी लष्करासाठी दोन लाख रकसॅकची निर्मिती करणार आहे. ९० लीटरच्या या रकसॅकची डिझाइन आणि इतर गोष्टींना संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. तसेच, या बँगांच्या चाचण्याही झाल्या असून, संरक्षण मंत्रालयाने कंपनीला निर्मितीची सुरुवात करण्यासही सांगितले आहे. कंपनीचे सध्या कर्नाटकमधील बंगळुरू आणि हिमाचल प्रदेशमधील सोनालमध्ये दोन मोठे कारखाने आहेत. लवकरच कंपनी देशातील ११ शहरांमध्ये ६५ नवे निर्मिती युनिट्स उभारणार असून, एक लाख लोकांना रोजगार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : ‘केव्हीआयसी’च्या मदतीने सशस्त्र दल टाकणार ‘स्वावलंबी भारत’चे पहिले पाऊल !
दरम्यान, यावेळी बोलताना गौरव डबलिश म्हणाले, “भारतीय लष्कराने दिलेली ऑर्डरही आम्हाला मिळालेल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ऑर्डरपैकी एक असून, आम्ही लवकरात लवकर ती पूर्ण करणार आहोत. मागील वर्ष संपण्याआधीच आमच्या कंपनीची निविदा भारतीय लष्कराने स्वीकारुन आम्हाला ऑर्डर देण्यासंदर्भात करार केला. आता या ऑर्डरनुसार आम्ही निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.”

तसेच, ”बॅगांबरोबरच कंपनीने करोना महामारीचे संकट लक्षात घेत मुखपट्टी (मास्क), वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई कीट) यांसारख्या गोष्टींची निर्मितीही सुरु केली आहे व ‘सुपरमास्क’ नावाने कंपनीने बाजारामध्ये मास्क विक्रीही सुरु केली आहे. तसेच, “कंपनीच्या चाहत्यांच्या मदतीने कंपनीचा तोंडी प्रचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशातील सर्वात मोठी लाइफस्टाइल कंपनी बनण्याचा आमचा उद्देश आहे, असे गौरव सुद यांचे म्हणणे आहे. सोबतच, २०२०-२१ पर्यंत आम्ही नायकी, आदिदास, रीबॉकच्या पुढे जाऊ आणि शक्य झाल्यास आम्ही प्युमालाही मागे टाकू, असा विश्वासही गौरव यांनी व्यक्त केला आहे.