ब्रेनवृत्त, २९ मे
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंतु देहू, आळंदीवरून पालख्यांचे पंढरपूरला प्रस्थान होणार असून, पादुका आषाढ शुद्ध दशमीला वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले.
पंढरीच्या आषाढी वारीच्या संदर्भात शुक्रवारी (ता.29) पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा प्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाची आषाढी वारी कशी काढायची, काढायची की नाही याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
(संग्रहित छायाचित्र)
या बैठकीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांनी पन्नास वारकऱ्यांसमवेत पायी जाण्याचा पर्याय दिला होता. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई आणि संत सोपानदेव संत एकनाथ यांच्या पादुका दशमीलाच वाहनाने थेट पंढरपुरात नेण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे एकत्रित निवेदन सोपानदेव पालखी सोहळाप्रमुख ॲड. गोपाळ महाराज गोसावी दिले होते. तर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांनी हेलिकॉप्टरने नेण्याचा पर्याय सुचविला.
या सर्व पर्यायांवर विचारविनिमय करून या संदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पवार यांनी सांगितले. त्यामुळे समस्त वारकरी संप्रदायाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तथापि, या वेळी सरकारचा निर्णय अंतिम असेल, असेही देवस्थानांच्या प्रमुखांनी म्हंटले आहे.