Site icon MarathiBrain.in

“ अद्वितीय, अमर आणि अटल ‘भारतरत्न’ !”

गेल्या एका तपाहून जास्त काळापासून ज्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख आपल्याला बघायलाही मिळाला नाही, ज्याच्याकडून वर्तमान जगताबद्दल प्रतिक्रियाही सबंध भारताला ऐकायला मिळाल्या नाही, अशा त्या व्यक्तिमत्वासाठी गेल्या आठवडाभर समस्त जनमानस काळजी वाहत होता, देवाकडे त्याच्या प्रत्येक जिवंत क्षणासाठी प्रार्थना करीत होता, अजून आयुष्य लाभो असे मनोमन चिंतीत होता. ही काळजी, हे प्रेम, अशा प्रार्थना कुणीतरी आपल्यातल्याच माणसासाठी आपण करत असतो. म्हणजे, नक्कीच! ती व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य इतरांसाठी वेचणारी असेल किंवा स्वतःमध्येच एक स्वतंत्र मानवीय विचारधारेचा स्रोत असेल. सर्वश्रुत माननीय भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांपैकी दोन्हीही होते.

कित्येक वर्षे विविध शारीरिक व्यधींशी झुंज देत अटलबिहारीजी लढले आणि शेवटी काल त्यांची प्राणज्योत मावळली. समस्त भारतदेश ह्या महापुरुषाच्या जाण्याने पोरका झाला. आज स्मृती स्थळावर त्यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली वाहिली जात आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या जाण्यांवर शोककळा पसरली आहे. या सर्वांसाठी माननीय अटलबिहारी वाजपेयींचे तसे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे एक प्रभावी उदाहरण आहेत, प्रेरणास्थान आहेत.

अमोघ वक्तृत्व, प्रभावी नेतृत्व, अजातशत्रू राजकारणी, सर्वसमावेशक नेते, संवेदनशील कवित्व, समाजहितचिंतक, भारतरत्न अशा विविध प्रकारच्या उपाधींनी सन्मानित वाजपेयीजी दैनंदिन जीवनातही एका विशिष्ट व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहेत. त्यांची कारकीर्द, त्यांनी बघितलेला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, आजचा भारत व पंतप्रधानपदी असलेला काळ ह्या सबंध स्थित्यंतरांनी त्यांना घडविले. ही ऐतिहासिक जडणघडण भारतमातेला अटलबिहारी वाजपेयी सारखं ‘रत्न’ देऊन गेली.

माननीय वाजपेयीजी आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांचे व्यक्तित्व, त्यांचे कार्य या रुपात ते सर्वांच्या मनात अमर झाले आहेत. त्यातच दिवंगत ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ व ‘ श्री. अटलबिहारी वाजपेयी’ भारतीय समाजाला एकाचवेळी अनुक्रमे राष्ट्रपती व पंतप्रधान म्हणून लाभलेत, हे समीकरण अद्वितीय आहे. तो काळ सुवर्णकाळ होता, राजकारणासोबतच अभूतपूर्व समाजकारणाचा काळ होता.  या दोघांना अनुक्रमे काळाने आपल्यात सामावून भारतभूवरील दोन सूर्य अस्तास नेले आहेत. मात्र त्यांची प्रभा चिरकाल टिकेल अशी आहे.  ज्याप्रकारे अटलबिहारी वाजपेयींची ओळख मुत्सद्दी राजकारणी म्हणून आहे, तशीच समाजकारण, जनसंघ, जागतिक स्तर, साहित्य, पत्रकारिता यांतही आहे. काळाचे विविध रूप, विविध पक्षांना त्यांनी दिलेला आधार, विपक्षातील लोकांशीही तितकाच असलेला स्नेहभाव अशा विविध पैलूंनी त्यांना वेगळेपणा दिला. हा त्यांचा वेगळेपणा, त्यांच्या जगण्याची अद्वितीय पद्धती, त्यांच्या कार्याची अभूतपूर्व रीत, समाजहितपर संवेदनशील व्यक्तिमत्व व एकूणच सहिष्णुता आज आपणा सर्वांना दिपवून जाणारी आहे. आज संपूर्ण जनसागर त्यांच्या जाण्याने शोकाकुल आहे. कुणीतरी आपल्यातील आज नाहीये ही  भावना मनाला दुखावणारी आहे. विश्वास होत नाही त्यांच्या नसल्याचा, जाण्याचा. मात्र त्यांच्या ९३ वर्षांचा हा प्रवास वर्षानुवर्षे भारतीय समाजाला नवविचार देणारा, प्रेरणा देणारा व चिरकाल टिकणारा आहे. असे अभूतपूर्व व्यक्तिमत्व असलेल्या अजातशत्रू महापुरुषास, अर्थातच माननीय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना marathibrain.com तर्फे शतशः प्रणाम! विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!

सागर बिसेन

sagar.bisen246@gmail.com

 

 

Exit mobile version