Site icon MarathiBrain.in

मानव विकास निर्देशांकात भारत ‘१३०व्या’ स्थानी !

संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘मानव विकास निर्देशांका’त भारताचा १३० वा क्रमांक आहे.

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम) अंतर्गत जाहीर झालेल्या मानव विकास निर्देशांकात (ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स) भारताचा क्रमांक १३०वा आहे. या निर्देशांकाच्या सुचीमध्ये एकूण १८९ देशांचा समावेश आहे.

 

दक्षिण आशिया विभागामध्ये भारताचे मानवी  विकास निर्देशांक मूल्य ०.६४० एवढे आहे. विविध देशांच्या निर्देशांकाच्या मूल्यांची संख्या ‘० ते १’ च्या दरम्यान मोजली जाते. याच दक्षिण आशिया विभागात जवळपास सारखी लोकसंख्या असलेल्या बांग्लादेश व पाकिस्तानचा अनुक्रमे १३६ व १५० वा क्रमांक लागतो.

२०१६ मध्ये भारताचे मानव विकास निर्देशांक मूल्य ०.६२४ इतके होते. म्हणजे नव्या अहवालानुसार भारताची स्थिती सुधारली असून निर्देशांक मूल्यात ०.०१६ ने वाढ झाली आहे.

● मानव विकास अहवालातील काही मुद्दे :

१) अहवालात एकूण १८९ देशांच्या क्रमवारींचा समावेश आहे.

२) या अहवालात नार्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी हे अग्रस्थानी आहेत.

३) यामध्ये भारताचा क्रमांक १३० वा असून निर्देशांक मूल्य ०.६४० एवढे आहे.

४) शेजारी देश, बांग्लादेश आणि पाकिस्तान यांची क्रमवारी अनुक्रमे १३६ व १५०.

५) भारताचा निर्देशांक ०.०१६ मूल्यांनी उंचावला आहे.

६) नायजेरिया, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, दक्षिण सुदान, चाड व बुरुंडी हे निर्देशांक क्रमवारीत खालच्या स्थानी आहेत.

 

● ‘मानव विकास निर्देशांक’ म्हणजे :

हे जगभरातील मानवी विकासाचे तीन स्तरांवरील दीर्घकालीन प्रगतीचे मोजमाप आहे. या तीन स्तरांमध्ये ‘दीर्घ व निरोगी जीवनाची आशा, ज्ञानार्जनाची संधी आणि चांगली जीवनशैली’ यांचा समावेश होतो.

 

( संदर्भ : मानव विकास अहवाल, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम)

◆◆◆

 

Exit mobile version