भारतात गंभीर उपासमारी कायम; भूक निर्देशांकात भारत १०१व्या स्थानी!
ब्रेनवृत्त | पुणे
जागतिक पातळीवर भारताची गणना पुन्हा एकदा गंभीर उपासमार असलेल्या देशांमध्ये झाली आहे. काल (गुरुवारी) जाहीर झालेल्या यंदाच्या वैश्विक भूक निर्देशांकात (GHI : Global Hunger Index) भारत एकूण 116 देशांपैकी 101 व्या स्थानावर आहे. जगातील सर्वाधिक गंभीर उपासमारी असणाऱ्या 31 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थितीत चक्क ७ स्थानांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या निर्देशांकात भारत 107 देशांमध्ये 94 व्या स्थानावर होता.
यंदाच्या वैश्विक भूक निर्देशांकानुसार भारतापेक्षा फक्त 15 देशांचीच स्थिती वाईट आहे. यांमध्ये पापुआ न्यू गिनी (102), अफगाणिस्तान (103), नायजेरिया (10४), कांगो (105), मोझाम्बिक (106), सिएरा लिओन (106), तिमोर-लेस्ते (108), हैती (109), लाइबेरिया (110) ), मादागास्कर (111), डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (112), चाड (113), सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (114), येमेन (115) आणि सोमालिया (116) यांचा समावेश आहे.
हेही वाचा : वर्षभरानंतर होणार सडलेल्या धान्यांची उचल; राज्य शासनाची परवानगी!
भारताच्या शेजारी देशांची स्थिती बघता बहुतेक शेजारी देश क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत. पाकिस्तान 92 व्या आणि नेपाळ 76 व बांगलादेश 76 व्या क्रमांकावर आहे. वर्तमान ग्लोबल हंगर इंडेक्सवर (जीएचआय) आधारित अंदाज दर्शवतात, की संपूर्ण जग आणि विशेषत: 47 देश 2030 पर्यंत उपासमारी कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरतील. २०१९ मध्ये भारत ११७ देशांमध्ये १०२ व्या स्थानी होता.
2021 जीएचआय क्रमवारीनुसार रँकिंगनुसार सोमालियामध्ये सर्वाधिक उपासमारीची पातळी आहे. सोमालियाचे गुण 50.8 असून ते अत्यंत चिंताजनक स्थितीला दर्शवतात. क्रमवारीत सोमालियाच्या आधी मध्य आफ्रिकन रिपब्लिक, चाड, कांगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मादागास्कर आणि येमेन हे पाच देश आहेत. या आकडेवारीनुसार जगभरात भारतसह 31 देशांमध्ये उपासमारीची पातळी गंभीर आहे.
शेतकऱ्यांचे प्राधान्य स्थानिक बाजारांना; कृउबास, शासकीय संस्था नाराजीचे केंद्र!
“जीएचआय गुण दर्शवतात की 2000 पासून जागतिक उपासमार कमी होत आहे, पण तिचा वेग मात्र मंद आहे. 2006 ते 2012 दरम्यान वैश्विक उपासमारी 25.1 ते 20.4 पर्यंत 4.7 गुणांनी घसरली असली, तरी 2012 पासून फक्त २.५ गुणांचीच घसरण झाली आहे”, असे अहवालात म्हटले आहे.
वैश्विक भूक निर्देशांकात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर 2030 पर्यंत शून्य उपासमारी प्राप्त करण्याच्या प्रगतीला मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मापदंडांचा मागोवा घेतला जातो. कुपोषण, शुष्क बालकुपोषण, खुरटे बालकुपोषण आणि बालमृत्यू या चार संकेतकांच्या मूल्यांचा आधार या निर्देशांकात घेतला जातो. ० ते १०० या गुणांच्या मोजपट्टीवर देशांची क्रमवारी ठरवण्यात येते. यामध्ये 0 हे सर्वोत्तम संभाव्य गुण आहे (उपासमारी नाही) तर १०० गुण सर्वात वाईट स्थिती दर्शवते.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in