मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, पॉल ऍलन यांचे कर्करोगाच्या गंभीर त्रासामुळे आज सियाटल येथे निधन झाले.
एएफपी वृत्तसंस्था
सियाटल, १६ ऑक्टोबर
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, समाजकारणी आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार पॉल ऍलन यांचे कर्करोगाच्या गंभीर त्रासामुळे आज सियाटल येथे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
मायक्रोसॉफ्टसारख्या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक पॉल ऍलन यांचे कर्करोगाच्या गंभीर त्रासामुळे निधन झाले असल्याचे, त्यांची कंपनी वल्कनने आज जाहीर केले आहे. त्यांच्या गैर-हॉगकिन्स लिंफोमा परतल्याच्या घोषणेच्या दोन आठवड्यांनंतर त्यांचे निधन झाले आहे. समाजकारण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी पॉल यांनी त्यांच्या बालपणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टसारखी मोठी कंपनी स्थापन केली. त्यांचे मायक्रोसॉफ्टला जगविख्यात करण्यात मोलाचे योगदान असल्याचे कंपनीच्या विविध स्तरावरील लोकांनी व्यक्त केले आहे.
‘ मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक म्हणून कार्यरत असताना पॉल यांनी त्यांच्या शांत आणि सतत कार्यशील स्वभावामुळे कंपनीला एक नवी ऊर्जा, नवे स्थान आणि नवा अनुभव प्राप्त करून दिला आहे. असे करत करत त्यांनी संपूर्ण जगच बदलून टाकले आहे’, अशा भावना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विटून व्यक्त केल्या आहेत.
Statement from Microsoft CEO Satya Nadella on the passing of Paul Allen: pic.twitter.com/1iLDLenLKz
— Microsoft (@Microsoft) October 15, 2018
मायक्रोसॉफ्ट सोबतच ऍलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स, ऍलन इन्स्टिट्यूट ऑफ सेल सायन्स आणि ऍलन इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा संस्थांची स्थापनाही पॉल ऍलन यांनी केली आहे. हवामान आणि ऊर्जा संशोधन क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
◆◆◆
पाठवा तुमचे लिखाण इथे प्रकाशित करण्यासाठी writeto@marathibrain.com वर.