” एकदा समाज यांचा मिंध्या झाला की जे मोहरे अराजकता माजवण्यासाठी वापरले जातात त्यांना व्यवस्थितपणे संपवले जाते. नवीन मोहऱ्यांना हे काम फत्ते करण्यासाठी जुन्यांच्या जागी रुजू केले जाते. “
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आणि सर्वधर्मसमभावाचा पोकळ डोंबारा पिटणाऱ्या या देशात सामाजिक तेढ खोलवर रुजली असल्याचा अनुभव, नक्षलवाद्यांशी संबंध असण्याच्या आरोपावरुन विविध राज्यांतील पाच माओवाद्यांना अटक करण्याच्या प्रकरणातून आला. अटक करण्यात आलेले सर्वच सुशिक्षित आणि बुद्धीजीवी मंडळी आहेत. नक्षलवाद्यांना सहाय्य करण्यासाठी त्यांची विवेकबुद्धी कशी काय साथ देते? हाच आजच्या घडीला कोणत्याही संवेदनशील माणसाला पडलेला गहन प्रश्न आहे. धर्म हे अफूच्या गोळीप्रमाणे असल्याचे म्हटले जाते. याच धर्माच्या नावाने हिंसेचा कळस गाठला जातोय. नक्षलवादी विचारधारेतून प्रचलित लोकशाही व्यवस्थेविरुद्ध वातावरण गढुळ करुन देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि एक भारतीय म्हणून हे सर्व अस्वस्थ करणारे आहे.
भारतात जे काही चालू आहे आणि यापूर्वी जे काही घडले आहे याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असताना, देशाचे मनोधैर्यहरण ‘डिमोरलायझेशन’, म्हणजेच देशाचे सामाजिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या देशाच्या भौगोलिक सीमांच्या आतून-बाहेरून, विशेष अशा अदृश्य शक्तींद्वारे केला जातो, अशी शंका येतेय. एखाद्या देशात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक अस्थैर्य निर्माण करणे, हा या अदृश्य शक्तींचा उद्देश आहे.
जिथे सामाजिक सीमारेषा कमकुवत असतात, समाज जास्त विचारी नसतो, देशाचे राज्यकर्ते स्खलनशील असतात, अशा देशांना अशा पद्धतीने नियंत्रणात आणणे जास्त कठीण नसते. देशाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघता वेळोवेळी या परिस्थितीचा प्रत्यय येतो. सोशल ब्रेनवाॅश करण्याचा या अदृश्य शक्तींचा उद्देश असतो. कोवळ्या मनावर आपली मते लादणे आणि आपल्याला हवे तसे करून घेणे, हा यांच्या कार्याचा भाग असतो. यासोबतच एखाद्या समाजाचे जे आदर्श आहेत, सामान्य व्यक्तीची ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्याविरुद्ध चुकीचे व विद्रोही साहित्य निर्माण करून ते पसरवणे हा यांचा मुळ हेतू असतो. एकदा का या विद्रोही लेखनाला समाज बळी पडला कि मग रावण चांगला वाटु लागतो आणि रामाला त्याच्याच देशात विरोध होऊ लागतो. अफजल गुरु सारख्यांच्या अंतयात्रेला हजारोंचा जनसमुदाय हजेरी लावतो व काहींना जगातील विस्थापीतांना आसरा देणारा हा देश असुरक्षित वाटू लागतो. आता तो दिवसही दूर नाही, जेव्हा घराघरातील कैलेंडरध्ये औरंगजेब जयंतीचीही एक तारीख असेल असे वाटत आहे. सध्याची परिस्थिति बघता यात किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणे, हा यांचा हेतू साध्य होऊ लागतो. कायदा-सुव्यवस्था, धार्मिक बाबी, शिक्षण व्यवस्था गढुळ करून असंतोष आणि अराजकता निर्माण करणे, हा यांच्या कार्यपद्धतीचा भाग असतो. मग सभोवताली घडत असलेल्या देशविरोधी आणि समाजविघातक चळवळींना पाठींबा दिला जातो. आज हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी बघतोच आहोत.
या अदृश्य शक्तींकडून प्रामाणिक व सत्वशील माणसाला मूर्ख आणि बावळट ठरवलं जाते. गुंडांचं पद्धतशीरपणे प्रमोशन केलं जाते. हे गुंड समाजशोषक नसुन परिस्थितीला बळी पडले असल्याचे भासवले जातो. संजूबाबाच्या चरित्रपटाने या मुद्दयावर शिक्कामोर्तब केलंच आहे. महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संघर्ष निर्माण केला जातो. शिक्षण बाजुला सारून नको त्या चळवळी उभ्या केल्या जातात. एकंदरीत देशात अराजकता माजवण्याचे आणि परकीय जीवनपद्धती बिंबवण्याचे अतोनात प्रयत्न केले जातात. एकदा समाज यांचा मिंध्या झाला की जे मोहरे अराजकता माजवण्यासाठी वापरले जातात त्यांना व्यवस्थितपणे संपवले जाते. नवीन मोहऱ्यांना हे काम फत्ते करण्यासाठी जुन्यांच्या जागी रुजू केले जाते. सेलेब्रिटी मंडळी, वलयांकीत व्यक्तीमत्व, स्वयंघोषित बुद्धीजीवी मंडळी यांचा उपयोग देशात अस्थैर्य निर्मितीसाठी केला जातो. शालेय शिक्षणात खोटा इतिहास छापला जातो, कोवळ्या बालमनावर फूटीरतेचे संस्कार केले जातात. आधी म्हटल्याप्रमाणे, काहींना तर आपला देशच असुरक्षित वाटायला लागतो. ज्यावेळी आपल्या सामाजिक व धार्मिक मूल्यांवर परदेशी मूल्य वरचढ होतात तेव्हा आपण या अदृश्य शक्तीला बळी पडलो आहोत असे समजुन जा.
या सर्वांपलीकडेही चालणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्यासारख्या सामान्यांच्या बुद्धीपलीकडे आहेत आणि त्या आपल्याला कधी कळणारही नाहीत. त्यामुळे समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेने प्रभावित झाला असाल वा भारावून गेला असाल तर वेळीच सावध व्हा! अशा अदृश्य शक्तीला आणि असत्याला भिरकावून लावा.
लेख: गोपाळ दंडगव्हाळे
कल्याण, मुंबई.
ट्विटर: @GopalDandgavale
◆◆◆
( प्रस्तुत लेखात मत व विचार हे पूर्णतः लेखकाच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित मजकूर आणि विचारांशी आम्ही दरवेळी सहमत असूच असे नाही. )
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.com