जेष्ठ पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी

आशिया खंडातील महत्त्वाचा मानल्या समजल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराच्या ६१ सत्राच्या पुरस्कारांची आज घोषणा झाली. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने जेष्ठ संपादक रवीश कुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

मराठीब्रेन डॉटकॉम

ब्रेनवृत्त | सागर बिसेन 

२ ऑगस्ट २०१९

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार समजला जातो. हिंदी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रवीश कुमार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार यावर्षी भारतीय पत्रकारिता क्षेत्रातील नावाजलेले रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. यावर्षी पुरस्काराचे ६१ वे वर्ष असून हा पुरस्कार पाच लोकांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार त्यांतील एक आहेत. म्यानमारचे को स्वे विन, थायलंडच्या अंगखना निलपैजित, फिलिपाइन्सचे रेमुन्डो पूजँते कॅयब्याब आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग की यांचा इतर चौघांमध्ये समावेश आहे. येत्या ९ सप्टेंबरला या पुरस्काराचे वितरण मेट्रो मनिला येथे होणार आहे.

७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव

रॅमन मॅगसेसे पुरस्कार संस्थेने दबलेल्या लोकांचा आवाज बनल्यामुळे रवीश कुुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे ट्विट करून सांगितले आहे. रवीश कुमार यांच्या एनडीटीव्हीवरील प्राईम टाईम शोमध्ये सामान्य जनतेच्या अनेक समस्यांना वाचा फोडली जाते. ‘रवीश कुमार यांच्यात आपल्या कामाप्रती असणारी प्रतिबद्धता, उच्च दर्जाची आणि पत्रकारिता करता असणारी नैतिकता, त्यांची सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी आणि स्वतंत्र भूमिका घेणे हे गुण कौतुकास्पद आहेत. सत्तेला प्रश्न विचारून व पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे’ असे पुरस्कार संस्थेने म्हटले आहे.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे रवीश कुमार हे सहावे भारतीय पत्रकार आहेत. रवीश कुमार यांच्याआधी हा पुरस्कार अमिताभ चौधरी (1961), बी. जी. वर्गीय (1975), अरुण शौरी (1982), आर. के. लक्ष्मण (1984) आणि पी. साईनाथ (2007) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

‘कुलदीप नय्यर’, लेखणीची ताकद सिद्ध करणारे व्यक्तिमत्व!

जेष्ठ पत्रकार रविश कुमार सन 1996 पासून एनडीटीव्हीशी जोडले गेले आहेत. देशातील सामाजिक समस्यांची अचूक नस पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याच्या कलेसाठी ते प्रसिद्ध आहेत. ‘रवीश की रिपोर्ट’ हा त्यांचा एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवरील कार्यक्रम बहुचर्चित आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत रवीश कुमार यांनी आज हे शिखर पटकावलं आणि इंग्रजीच सर्वकाही नाही असेही सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांना जाहीर झालेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे व भावी पत्रकारांसाठी ते आदर्श ठरले आहेत.

 

● रॅमन मॅगसेसे पुरस्कार : आशियायी नोबेल

– रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

– न्युयॉर्कमधील रॉकफेलर ब्रदर्स फंडचे विश्वस्त व फिलिपिन्स सरकारच्या सहयोगाने एप्रिल १९५७ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. १९५८ मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला होता.

– हा पुरस्कार सरकारी सेवा, सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता, सामुदायिक नेतृत्त्व, साहित्य, शांतता, कलात्मक संभाषण कौशल क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: