नागपूर , २८ ऑगस्ट
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रक्तसंग्रहण केंद्र (ब्लड स्टोरेज युनिट) सुरू झाले आहे. यामुळे अपघाती रुग्णांच्या नातेवाइकांची ऐनवेळी होणारी धावपळ आता थांबूू शकेल. लोकलेखा समितीने दोन महिन्यांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्यावेेेळी रक्तसंग्रहणाच्या या अनुपलब्धतेबद्दल रुग्णालयाचे कान टोचले होते.
अपघातग्रस्त रुग्णांना अनेकदा रक्ताची गरज भासत असते. आतापर्यंत रूग्णालयामधील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचाराची अद्ययावत सोय असली, तरी तेथे रक्तपेढी किंवा रक्त संग्रहण केंद्र नव्हते. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी इतरत्र धावपळ करावी लागत होती. लोकलेखा समितीने ट्रॉमा केअर सेंटरच्या निरीक्षणात या गंभीर विषयावर प्रश्न उठवून प्रशासनासह वैद्यकीय सचिवांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रुग्णालयाकडून तातडीने ट्रॉमाच्या रक्त संग्रहण केंद्राचे काम हाती घेण्यात आले. मागील आठवड्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अखेर ते आता सेवेत दाखल झाले आहे.
ट्रॉमाच्या पहिल्या मजल्यावरील रुग्णालयाच्या मॉड्युलर रक्तपेढीतून नित्याने रक्ताच्या पिशव्या आणून संग्रहित होणार आहेत. त्या गरजेनुसार आता नातेवाइकांना उपलब्ध केल्या जातील. सद्यस्थितीत ट्रॉमाला रोज १० ते १२ रक्तपिशव्यांची गरज भासते. रक्त संग्रहण केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना वेळीच रक्त मिळत असल्याचे, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांनी सांगितले.
◆◆◆