Site icon MarathiBrain.in

स्पर्धापरिक्षांसाठी ‘लोकराज्य’ उपयोगी मासिक – डॉ.रजनी चतुर्वेदी

शहरातील न.मा.द. महाविद्यालयात ‘लोकराज्य वाचक अभियान’ कार्यक्रमाचे आज आयोजन. 

गोंदिया, ११ सप्टेंबर

‘शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. ‘लोकराज्य’ स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी उपयोगी असून, करियर घडविण्यासाठीही उपयुक्त आहे’, असे मत न. मा. द महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. शहरातील नमाद महाविद्यालयात आज आयोजित ‘लोकराज्य वाचक अभियान’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

डॉ.चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची व उपक्रमांची विस्तृत माहिती दिलेली असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचताना लोकराज्य मासिकाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, प्रा.बबन मेश्राम, डॉ.किशोर वासनिक, प्रा.शशिकांत चवरे, डॉ.अर्चना जैन, प्रा.उमेश उदापुरे, प्रा.आशा बघेले, प्रा.पटले व प्रा.भुरे उपस्थित होते.

प्रा.मेश्राम म्हणाले, शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यने विविध विषयांवर विशेषांक काढले असून हे विशेषांक लोकप्रिय ठरले आहेत. लोकराज्य वाचक अभियानात लोकराज्य घरोघरी पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मोहीम आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
प्रास्ताविकातून श्री.गिते म्हणाले, लोकराज्य मासिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे मासिक असून शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती देणारे मासिक आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून लोकराज्यचे नियमीत वाचन करावे व शासनाच्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असे त्यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत दिलेल्या भाषणास आज १२५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमीत्त त्यांच्या ऐतिहासिक भाषणाचे वाचन या निमित्ताने महाविद्यालयात करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो परिषदेतील भाषण आजही प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी सांगितले. बंधू आणि भगिनींनो असे संबोधन विवेकानंदांनी याच भाषणात केल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी यांचे हे भाषण ऐतिहासीक असून या भाषणाचे पठण प्रत्येकाने करावे असे त्या म्हणाल्या.

यावेळी ‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन धम्मदिप मडामे यांनी केले, उपस्थितांचे आभार प्रा.आशा बघेले यांनी मानले. कार्यक्रमास नमाद महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

( जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया, महाराष्ट्र)

●●●

Exit mobile version