डोंगर कर्जाचा माज्या उरावर बाळगतो ।
होय! मी शेतकरी, शेती घामानं नांगरतो ।।
वावरात माज्या उभा पीक मी जारतो,
जवा आभाळ हा, सावत्र आईवाणी वागतो । (१)
माज्या जीवनाची का सांगू तुमाले मी व्यथा,
आमच्याच डोक्स्यावर बसून, सरकार ईदरते लाथा । (२)
मी बी लहानाचा मोठा झालो, आयकून यायच्या कथा,
देतेत बापाच्या उसने आस्वासन, अन् करतेत मोठाले बाता । (३)
शेतकरी म्हणजे येयले वाटते बिचारा,
अरे त्यालेबी कदीतरी, त्याच्या भावना विचारा । (४)
नाई भेटे त्याच्या बैलाले कदी हिरवा चारा,
एका भाकर-चटणीवर तो ढकलते दिस सारा । (५)
खरेदी केंद्रावर पडला धान महिन्याभऱ्यापासून,
मात्र सेठ-मारवाड्याला विक्री भेटते ठासून ठासून । (६)
आमच्या धानाले अडवता ऑनलाइनचे ग्रहण सांगून,
अना ठेकेदाराले मात्र भाव देता, मांगच्या मांगून । (७)
गऱ्हाणे माये मी सरकार मोयरं लळतो,
सत्तेवर कोणिबी असो कंबर कासत्काराची मोळतो । (८)
लावून वावराले आग, सुतुक तुया नावाना पाळतो,
पिकाले भाव नाही माया म्हूण, फास गऱ्याले ओळतो । (९)
होय! मी शेतकरी, शेती घामानं नांगरतो…
डोंगर कर्जाचा माज्या, उरावर बाळगतो ।।
कवी : राहुल हटवार
सालेकसा, जि. गोंदिया
भ्र. क्र. +९१-९१७५८०२८९८
ई-मेल : rhatwar007@gmail.com
◆◆◆
पाठवा तुमचे लिखाण, प्रतिक्रिया आणि सूचना writeto@marathibrain.com वर.
विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.com ला. फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.