Site icon MarathiBrain.in

‘तिरंगा रॅली’ प्रकरणी अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस

विद्यापीठात तिरंगा रॅली काढल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले आहे.

 

मराठीब्रेन वृत्त

अलिगढ, २४ जानेवारी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘तिरंगा रॅली’ काढल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परवानगी न घेता रॅली काढल्याचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवत, २४ तासांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे विद्यापीठाने बजावले आहे.

तिरंगा रॅली काढल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. छायाचित्र स्रोत : IANS

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात तिरंगा रॅलीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही परवानगी न घेता विद्यापीठात ही फेरी काढली असून, अशा रॅलीमुळे शैक्षणिक वातावरण दूषित होते, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना २४ तासांच्या आत स्पष्टीकरण मागत विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केले आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशी भव्य ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली असल्याचे कळते.

तर दुसरीकडे, रॅलीचे आयोजक असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी अजय सिंहने सांगितले आहे की, “प्रशासनाला आम्ही परवानगी अर्ज सादर केला होता, मात्र ते विद्यापीठाने नाकारले. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना नाकारण्याची ही पहिली वेळ नसून, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली म्हणून ‘कँडल मार्च’लाही परवानगी नाकारण्यात आली होती.”

भाजप आमदार दलबीर सिंग यांनी ‘तिरंगा रॅली’ प्रकरणी त्यांच्या नातवाला व इतर विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

◆◆◆

Exit mobile version