ऑक्सिपार्क प्रकल्पावरून पुणे विद्यापीठाला उच्चशिक्षण मंत्र्यांची फटकार!
ब्रेनवृत्त | पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्सिपार्कच्या नावाखाली शुल्क वसुलीच्या संकल्पनेवरून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुणे विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच फटकारले आहे. विद्यापीठाने स्वत: झाडे लावून, पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्क उभे करून दाखवावे व त्यासाठी शुल्क आकारावे, असे सामंत यांनी म्हटले.
“पुणे विद्यापीठाच्या आवारात वर्षानुवर्षे असलेल्या वृक्षसंपदेला ऑक्सीपार्कचे नाव देऊन नागरिकांकडून पैसे घेणे योग्य नाही. विद्यापीठाने स्वत: झाडे लावून व पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्क उभे करून शुल्क आकारावे”, अशा शब्दांत उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला फटकारले. विद्यापीठात येणाऱ्या सामान्य नागरिकांना माझा पाठिंबा असून, त्यासाठी कोणाचाही रोष पत्करायला तयार असल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले.

वाचा | प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड
आज (रविवारी) एका बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आले असता सामंत यांनी ऑक्सिपार्कच्या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. “विद्यापीठातील झाडे आणि निसर्गसौंदर्य वर्षानुवर्षांपासूनचे आहे. त्यामुळे, विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारणे गैर आहे. माझे विद्यापीठाच्या प्रशासनाशी कोणतेही वाद नाहीत, मात्र चुकीच्या निर्णयाचे समर्थन करता येणार नाही”, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सीपार्क’ या उपक्रमाअंतर्गत सावित्राबाई फुले, पुणे विद्यापीठाने विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, काही अटींवरून वयस्क नागरिकांना शुल्कात सवलत देण्याचेही जाहीर केले होते. मात्र विद्यापीठाच्या ह्या निर्णयावरून सगळीकडून टीका झाली. त्यावरून वादाची स्थिती उत्पन्न झाल्यानंतर उदय सामंत यांनी मध्यस्थी करत या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली.
वाचा | एमसीएचा कालावधी दोन वर्षांचा करण्यास पुणे विद्यापीठाची मंजुरी
● पुणे विद्यापीठाचा ऑक्सिपार्क प्रकल्प
पुणे विद्यापीठातील वृक्षसंपदा, निसर्ग आणि पंक्षीसंचार यासाठी ‘ऑक्सीपार्क’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. या निसर्गसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांकडून शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. नागरिकांकडून दरमहा एक हजार रुपये, सहामाही शुल्क भरल्यास ५,५०० रुपये तर वर्षभराचे शुल्क भरल्यास १० हजार रुपये आकारले जाणार होते. शुल्क भरणाऱ्या नागरिकांना निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी विशिष्ट ओळखपत्र दिले जाणार होते.
एकूणच, विद्यापीठाला लाभलेली हिरवळ आणि निसर्गसौंदर्य हे नैसर्गिक असून, वर्षानुवर्षांपासूनचे आहे. मात्र विद्यापीठाची आर्थिक बाजू बळकट करण्याच्या उद्दिष्टाने विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ आवारात फिरायला येणाऱ्या लोकांकडून पैसे घेण्याची युक्ती लढवली होती.
अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.
फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.
तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.