Site icon MarathiBrain.in

हजारीका कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ला नकार!

जेष्ठ संगीतकार भुपेन हजारीका यांना मरणोत्तर जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास हजारीका कुटुंबीयांनी नकार दिला आहे. वादातीत  असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मराठीब्रेन वृत्त

आसाम, ११ फेब्रुवारी

जेष्ठ संगीतकार भुपेन हजारीका यांना मरणोत्तर जाहीर झालेला ‘भारतरत्न’ पुरस्कार स्वीकारण्यास हजारीका कुटुंबीयांनी नकार दिला आहे. वादातीत असलेल्या ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९’ला विरोध म्हणून हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्यांचे पुत्र तेज हजारीका यांनी म्हटले आहे.

हजारीका कुटुंबीयांनी ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार दिला आहे

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न व पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी आसामचे जेष्ठ संगीतकार भुपेन हजारीका यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला. मात्र आता या विषयाला नवे वळण मिळाले आहे. संगीतकार व कवी भुपेन हजारीका यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९’ ला विरोध म्हणून हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे हजारीका यांचे पुत्र तेज हजारीका यांनी सांगितले आहे.

“मला माहिती आहे की देशभर माझ्या वडिलांच्या कार्याचा आणि शब्दांचा गौरव होतो आहे. मात्र शासनातर्फे नागरिकत्व कायद्यात अपेक्षित नसलेले बदल करण्यात येत आहेत, जे आसामला किंवा ईशान्य भारतातील लोकांना मान्य नाही. अशा विधेयकामुळे माझ्या वडिलांचा अपमानच होणार आहे. नव्या विधेयकाला मंजुरी देणे म्हणजे, प्रत्यक्षपणे भुपेन हजारीका यांच्या थेट विरोधातच जाण्यासारखे आहे”, असे तेज हजारीका म्हणाले. तरीपण, माझ्या वडिलांना भारतरत्न देण्यापेक्षा शासनाने नागरिकत्व विधेयकाच्या मुद्यावर गांभीर्याने लक्ष देणे आधी गरजेचे असल्याचे तेज म्हणाले.

◆ काय आहे विधेयक?

‘नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९’ नुसार बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना ,(जे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आले आहेत) अशांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. यामुळे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांतील १ कोटींपेक्षा जास्त आदिवासीयांवर या विधेयकाचा परिणाम होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली होती. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार भुपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. एका वर्षात एकसोबत तीन लोकांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून केंद्र शासनाने नागरिकांना आश्चर्याचा धक्काच दिलाय.

दरम्यान, दिवंगत भुपेन हजारीका यांचे भाऊ समर हजारीका यांनी मात्र भारतरत्न स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. समर हजारीका म्हणाले की, “भारतरत्न न स्वीकारणे हा तेजचा स्वतःच निर्णय आहे, माझा नाही. असो, तरीपण मला असं वाटतं की, हा पुरस्कार स्वीकारला जावं. असंही ते देण्यात आधीच खूप उशीर झाला आहे.”

 

● भुपेन हजारिका यांच्याबद्दल :

आसमी संगीत जगभर पोहोचवत चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी देण्याच काम भुपेन दा यांनी केले आहे. ते गायक, संगीतकार, कवी आणि निर्माते होते. आसाम जिल्ह्यातल्या तिनसुखीया जिल्ह्यात ८ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. फक्त आसमीच नाही, तर त्यांनी हिंदीसहीत अनेक भारतीय भाषांमधली त्यांची गाणी प्रचंड गाजली आहेत. ५ नोव्हेंबर २०११ ला त्यांचे निधन झाले.  ‘दिल हूम हूम करे’आणि ‘ओ गंगा तू बहती है क्यों’ ही त्यापैकी महत्त्वाची गाणी आहेत.

 

◆◆◆

Exit mobile version