ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत योजने’ला चालना देण्यासाठी आता खासगी क्षेत्राला ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’च्या (ISRO) सुविधा आणि मालमत्ता वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंतराळ उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागास चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला असून यापुढे खासगी क्षेत्र भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या प्रवासात सह-प्रवासी असेल, अशी माहिती केंद्रीय अणू उर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
(संग्रहित छायाचित्र)
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या (मोदी २.०) पहिल्या वर्षात अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या कर्तृत्वाबद्दल माहिती देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, ”खासगी कंपन्यांना उपग्रह, प्रक्षेपण आणि अंतराळ आधारित सेवा स्तरावरील क्षेत्र उपलब्ध करुन दिले जाईल. तसेच, भविष्यातील ग्रह शोध, बाह्य अवकाश प्रवासाचे प्रकल्पही खासगी क्षेत्रासाठी खुले असतील. यावेळी इस्रोने हाती घेतलेल्या भारताच्या प्रथमच मानव अंतराळ अभियान ‘गगनयान’ बद्दल माहिती देताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड पूर्ण झाली आहे. रशियामध्ये त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यत्यय आला. मात्र, या प्रकल्पाचा लवकरच पाठपुरावा केला जाईल.
(संग्रहित छायाचित्र)
अलिकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘इस्रो’ने देशातील तरुण पिढीसाठी युवा वैज्ञानिकांसाठी ‘युविका’ हा नवा कार्यक्रम सुरू केला आहे. अंतराळ तंत्रज्ञानाविषयी मूलभूत ज्ञान आणि माहिती तरुण पिढीला असावी, असा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, कोव्हिड-१९ महामारीच्या काळातही, इस्रोचे वैज्ञानिक आवश्यक वैद्यकीय उपकरणे, संरक्षक उपकरणे आणि इतर उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी उत्तम पद्धती शोधण्यात गुंतले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.