ब्रेनवृत्त, १९ मे
‘कोव्हिड-१९‘चे संकट गेल्यानंतर देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक लाखपेक्षा अधिक गावांत सेंद्रिय पीक (Organic Crops) घेण्याची मोहीम सुरु करण्यासंबधी आदेश दिले आहेत. कोरोना संकटाच्या काळात शहरातील अनेक मजूर आता गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे शहरी भागांसह ग्रामीण भागातीलही अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. कोरोनाचे संकट गेल्यानंतर देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल कृषी मंत्रालयाची बैठक झाली. या बैठकीत गावात मातीची गुणवत्ता चांगली करण्यावर भर दिला जावा, यावर केंद्रीय मंत्री मंत्री नरेंद सिंह तोमर यांनी लक्ष केंद्रीत केले. प्रत्येक शेतातील मातीची स्वास्थ नोंदणी केली जावी, यातून कोणतेच शेत राहू नये,असा आदेश तोमर यांनी मंत्रालयाला दिला आहे. यासाठी मृदा परीक्षणासाठी (Soil Testing) गावांमध्ये ३ हजार प्रयोगशाळा स्थापित करण्यात येतील. यासाठी कृषी, बचत गट, सहकारी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणांना माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रयोगशाळा सुरु केल्यानंतर तिथे तीन लोकांना काम मिळते. यामुळे सुमारे ९ हजार लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे.
नक्की वाचा : ‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली
● माती परीक्षणाचे फायदे
‘माती परीक्षण’ (Soil Testing) म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे, हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे.
◆◆◆