Site icon MarathiBrain.in

चार देवस्थानांचा वारीचा पायी दिंडी सोहळा रद्द !

ब्रेनवृत्त, पुणे

‘कोव्हिड-१९’ महामारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी चार देवस्थानांनी यावर्षीचा पायी सोहळा रद्द केला आहे. एकनाथ महाराज, पैठण, निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका, सासवड या देवस्थानांनी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.

रघुनाथ महाराज गोसावी म्हणाले की, प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमात राहून पालखी निघेल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावात मुक्काम करेल. त्यानंतर, पैठणमध्ये नाथच्या जुन्यावाड्यातून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल. दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. तर, दशमीला ३० मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी. हा सगळा प्रवास मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी होईल.

“कमीत कमी पाच लोकांच्या पायी सोहळ्याला परवानगी मिळावी, यासाठी शासनाकडे विनंती केली आहे. जर शासनाने परवानगी दिली, तर वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होणार नाही. सोहळा पाच लोकांसह पूर्ण करण्यात येईल. परवानगी मिळाली नाही, तरी दशमीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी”, अशी विनंती या सर्व मानकर्‍यांनी शासनाला केली आहे.

दरम्यान, आषाढी वारीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आळंदी आणि देहू देवस्थानच्या विश्वस्तांची १५ मे रोजी पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहू मधुन मोजक्या लोकांसह पायी पालखी सोहळा पार पाडावा, मात्र त्याची रुपरेषा प्रशासनाकडून ठरवली जावी, असा सुर या बैठकीत उमटला. परंतु, वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांची परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बैठकीत 30 मे नंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

◆◆◆

Exit mobile version