Site icon MarathiBrain.in

आता मुंबईच्या धर्तीवर सर्व जिल्ह्यांत ‘कोव्हिड-१९’ कृती दल

ब्रेनवृत्त | मुंबई

राज्यात ‘कोव्हिड-१९’ विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे स्वतंत्र कृती दल (Task Force) नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हास्तरावर कृती दल स्थापना करण्याची माहिती दिली आहे.

या कृती दलात डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असून, ‘कोव्हिड-१९’ला नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी हे कृती दल जिल्हास्तरावर काम करतील. हे कृतीदल नेमण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची असेल. राज्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कृती दल नेमण्याबाबत कळविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.

राज्यात सध्या ‘साथरोग प्रतिबंधक अधिनियम, १८९७’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या कृती दलांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल, असेही देशमुख यांनी म्हटले.

 

Exit mobile version