Site icon MarathiBrain.in

मुंबई महापालिका नाट्यगृहांमध्ये बसवणार जॅमर!

ब्रेनवृत्त, मुंबई

नाट्यगृहांमध्ये चलभाषयंत्रांच्या वापरावर प्रतिबंध आणण्यासाठीच्या मराठी नाट्यकलावंतांच्या विनंतीला मान्य करत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सुबोध भावे, सुमित राघवन व इतर नाट्यकवंतांकडून स्वागत करण्यात येत आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांकडून चलभाष यंत्रांचा (मोबाईल फोन्स) वापर होत असल्याने मराठी नाट्यकलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर पर्याय म्हणून नाट्यगृहांमध्ये रेडिओ संदेशवहन अडथळे (जॅमर्स) लावण्यात यावे अशी मागणी सुबोध भावे, सुमीत राघवन, विक्रम गोखले यांसारख्या नाट्यकलावंतांनी मुंबई महापालिकेकडे केली होती. ही मागणी महापालिका प्रशासनाने मान्य केली आहे. महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर्स बसवण्यात येतील व ही सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या अटी व शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, ही यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील, असेही महापालिकेने म्हटले आहे.

हेही वाचा : जाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल!

प्रशासनाच्या या निर्णयाचे अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन व इतर मराठी नाट्यकलावंतांनी स्वागत केले आहे. “प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सकारात्मक असला, तरी दुर्दैवीसुद्धा आहे. जर लोकांनी स्वत:हून नाटकादरम्यान मोबाईल फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवले असते, तर ही वेळ आली नसती. लोक ऐकत नसतील, तर प्रशासनाची ही कृती अभिनंदनीय आहे”, असे सुबोध भावे म्हणाले. मात्र, सक्तीची कृती व जबरदस्तीची शिक्षा याच्याही विरोधात असल्याचे भावे म्हणाले. तर सुमित राघवन यांनी म्हटले आहे की “प्रशासनाने उत्तम निर्णय घेतला आहे. आम्ही कलाकार जो काही त्रास सहन करत होतो, अखेर त्याचा विचार केला गेला. हा निर्णय घेणं गरजेचं होतं.”

देशातील सर्वात जास्त डेटा केंद्र मुंबईत

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहात कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी सभागृहात ध्वनीक्षेपणाद्वारे भ्रमणध्वनीयंत्र बंद ठेवण्याचे, तसेच शांत राहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले जाते. प्रयोग सुरु होण्यापूर्वीही नाट्यकलावंतांकडूनही अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. मात्र, तरीही प्रयोगादरम्यान काही लोक सूचनांचे पालन करीत नाही व कार्यक्रमात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाच्या पूर्व मंजुरीनंतरच नाट्यगृहात ‘रेडिओ संदेशवहन अडथळे’, अर्थात ‘जॅमर’ बसवण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन जॅमर बसवावेत किंवा नाही याबाबत तीन दिवसांच्या कालावधीमध्ये नाट्यनिर्माते, संस्था, तसेच नागरिकांकडून हरकती आणि सूचना महापालिकेतर्फे मागवण्यात येणार आहेत.

 

◆◆◆

Exit mobile version