डोंगरी दुर्घटना प्रकरणी सहाय्यक आयुक्त निलंबित
ब्रेनवृत्त, मुंबई
मुंबईच्या डोंगरी भागातील केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या बी वार्ड चे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित करण्यात आले आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेद्वारे पहिली कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे.
छायााचित्र : ट्विटर
मुंबईच्या डोंगरी भागातील केसरभाई इमारतीचा अर्धा भाग कोसळण्याची घटना या आठवड्यात घडली आहे. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काही लोक अजूनही जखमी अवस्थेत आहेत. मुंबई महापालिकेने या दुर्घटना प्रकरणी कारवाईची सुरवात करत, महापालिकेच्या बी वार्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले आहे. हा निर्णय महापालिका आयुक्त प्रविनसिंह परदेशी यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे परदेशी यांनी या प्रकरणी सध्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, मात्र त्यांनी सध्या कार्यरत सहाय्यक आयुक्तालाच निलंबित केेले.
#डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री @dev यांची घोषणा. जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासन करणार. pic.twitter.com/K7dFY6pfzK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 17, 2019
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित इमारतीचा म्हाडाच्या ‘अतिधोकादायक इमारती’ श्रेणीत याचा समावेश नसल्याची माहिती दिली होती. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र विकासकाने काम वेळेत काम केले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व दुर्घटनास्थळी बचाव व मदतकार्याला प्राधान्य दिले जाईल असेही मुख्यमंत्रीही म्हणाले आहेत. त्यासाठी यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
मुंबईच्या डोंगरी भागातील १०० वर्षे जुन्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याने आतापर्यंत १४ लोकांना जीव गमवावा लागला आहे, तर ९ जण अद्याप जखमी आहेत. या सर्व जखमींना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बुधवार संध्याकाळी घटनास्थळवरील बचावकार्य थांबवण्यात आले.
◆◆◆