Site icon MarathiBrain.in

राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्यांना घरी पोहचवणार ‘एसटी’

महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थी, कामगार व इतर नागरिकांना त्यांच्या गावी-तालुक्याला एसटी बसने पोहचवण्यात येणार असल्याचे निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई, ६ मे

महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, मजूर आणि इतरांना एसटीद्वारे त्यांच्या गावी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या दहा हजार ‘एसटी’ बसेस उद्यापासून (7 मे) धावतील, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढविल्याने अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर राज्यातील विविध शहरांत अडकले आहेत. अशातच कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “एसटीच्या तब्बल 10 हजार बसेसच्या मार्फत राज्यभरामध्ये लोकांना त्यांच्या गावी वा तालुक्याला मोफत सोडलं जाईल. यासाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन विभाग करणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा मोफत असेल कोरोनासाठीच्या सगळ्या नियमांचं पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल.”

यासाठी मदत-पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून एसटीचा खर्च देण्यात येईल. परिवहन मंत्र्यांनी बसेस देण्यासाठी सहमती दर्शवली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या गावांत वा जिल्ह्यांमध्ये लोक अडकलेले आहेत, त्यांना स्वतःच्या गावी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, यासाठीची व्यवस्था आणि नियोजनाच काम सुरु आहे. मोफत बसेसच्या माध्यमातून पुढच्या दोन दिवसांमध्ये या नागरिकांना त्यांच्या गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू होणार  आहे. पण या प्रवासासाठी नोंदणी कधी वा कुठे करायची, चाचण्या होणार असल्यास त्या कुठे करायच्या, याविषयीची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

◆◆◆

Exit mobile version