परभणी , ५ जुलै
जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय भांबळे यांनी नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीतील जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांनी नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. विजय भांबळे यांनी जिंतूर नगर परिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना काल त्यांच्या घरी बोलावले होते. यावेळी भांबळे यांनी अधिकाऱ्याला तुम्ही काम बरोबर का करत नाही? असे म्हणून वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. याप्रकरणी भांबळे यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एबीपी माझा नेे प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण नगरपरिषदेेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर घडले. सदर घटनेच्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्षांचे पती कपिल फारुकी यांच्यासह नगरसेवक व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. यानंतर कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यााआधीही आमदार भांबळे आणि अनेक अधिकाऱ्यांमध्ये अशी वादाची प्रकरणे झाली आहेत, मात्र पहिल्यांदाच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे २ लाख रुपयांचे घरपट्टी माफ करत नाहीत, म्हणून विजय भांबळे यांनी कर निरीक्षकाला घरी बोलावले होते व ‘माझे काम करत नाही’ असे म्हणून मारहाण केल्याची माहीती समोर आली आहे.
◆◆◆