Site icon MarathiBrain.in

मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ऍप’ नसल्यास होणार शिक्षा !

ब्रेनवृत, नोएडा

कोरोना विषाणू‘बद्दलची माहिती देणाऱ्या ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’बद्दल दिल्ली सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने तयार केलेले ‘आरोग्य सेतू‘ हे अनुप्रयोग (ऍप) स्थानिक नागरिकांनी स्मार्टफोनवर डाऊनलोड केले नाही, तर एक हजार रुपयांचा दंड अथवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, असा इशारा नोएडा येथील पोलिसांनी दिला आहे.

दिल्लीत नोएडा आणि ग्रेटर नोएडा याठिकाणी ‘कोव्हिड-१९‘ च्या संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी  राहणाऱ्यांनी आणि  येथे बाहेरून येणाऱ्यांनी ‘आरोग्य सेतू’ हे अप्लिकेशन डाउनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. या अॅपचा वापर करण्याची आवाहने केंद्र शासनाचे वतीने वारंवार केली जात असून, नोएडा पोलिसांनी ‘आरोग्य सेतू‘ अनुप्रयोग वापरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे आरोग्य सेतू ऍप नसल्यास गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेशच पोलिसांनी काढले आहेत.

दिल्लीकरांवर ‘कोरोना कर’ ; पेट्रोल-डिझेलची किंमतही वाढली !

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना संबंधित माहितीसाठी केंद्र सरकारनं ‘आरोग्य सेतू’ विकसित केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ केले जाते. आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत का, याची माहिती ब्लूटूथच्या माध्यमातून अ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळते. तसेच, कोरोनाबाधित व्यक्ती किती दूर आहे, याची माहितीही यावर मिळते. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती फार दूर असेल, तर ‘ग्रीन अलर्ट’ मिळतो. ती व्यक्ती मध्यम अंतरावर असल्यास ‘ऑरेंज’ आणि अतिशय जवळ असल्यास ‘रेड अलर्ट’ मिळतो.

नोएडाचे  कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार याबाबत बोलताना म्हणाले की, “ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे जिल्हा दंडाधिकारी ठरवतील.” तसेच, “पकडल्यानंतर लोकांनी जर हे अनुप्रयोग लगेच डाउनलोड केले, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल.” लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन ऍप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर आरोग्य सेतू ऍप डाउनलोड केलं नाही, पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील,” असेही कुमार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,  कोरोना विषाणूबद्दलची माहिती देणारे ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ सरकारी आणि खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी फोनमध्ये डाऊनलोड करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सगळ्या रहिवाशांनादेखील आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

 

◆◆◆

Exit mobile version