ओडिशाच्या बऱ्हाणपूरमधील एका जोडप्यानी भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन व रक्तदान शिबीर आयोजित करून लग्नसोहळा साजरा केला. विविध पारंपरिक प्रथांना दूर सारत या जोडप्यानी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेल्या लग्न सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे.
ब्रेनवृत्त | ओडिशा
ओडिशा राज्याच्या बऱ्हाणपूरमधील एक जोडपे त्यांनी अतिशय वेगळ्या पध्दतीने केलेल्या लग्नामुळे चर्चेचा विषय बनले आहे. या जोडप्याने भारतीय राज्यघटनेला साक्षी मानत आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली व त्यानिमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करून लग्नसोहळा साजरा केला आहे. सोबतच, या दोघांनीही त्यात सहभागी होऊन रक्तदानाचे समाजकार्य केले आहे.
ओडिशाच्या बऱ्हाणपूरमधील बिप्लब कुमार (३१ वर्षे) आणि अनिता (२३ वर्षे) यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपला लग्नसोहळा पार पाडला आहे. ह्या दोघांनी भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन लग्नविधी पूर्ण केला. सोबतच, या दिवसाची आठवण म्हणून त्यांनी रक्तदान शिबिरही आयोजित केले. बिप्लब हा एका औषधोत्पादन कंपनीत काम करतो, तर अनिता सहाय्यक परिचारिका व सुईण (ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ – ANM) म्हणून काम करते.
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने या जोडप्याने समाजाला काही समाजहिताचे व पर्यावरणपूरक संदेशही दिले आहे. सर्वांनी हुंडा नाकारवा, असे आवाहन बिप्लब करतो. बिप्लब म्हणतो, “कुणीही हुंडा मागू नये. साधेपणाने केलेले लग्न हे पर्यावरणपूरक असतात, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा समावेश नसतो आणि सोबतच, ध्वनी प्रदूषणही होत नाही. आमच्या लग्नात आम्ही वऱ्हाडीसुद्धा टाळलेत. सर्वांनी रकदानाच्या सत्कार्यात सहभागी व्हावे.”
अनितानेही सारख्याच भावना व्यक्त करत आयुष्याच्या या नव्या टप्प्याची सुरुवात करताना आनंदी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “रक्तदानासारख्या चांगल्या कार्यापासून माझ्या नव्या आयुष्याला मी सुरुवात करीत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. यावेळी विधवा महिलांनीही यात सहभाग घेतला. अशाप्रकारचे लग्न इतरांसाठी उदाहरण ठरायला हवे”, अशी अनिता म्हणाली.
स्रोत : एएनआय वृत्तसंस्था
अनुवाद आणि संपादन : टीम मराठी ब्रेन
◆◆◆