Site icon MarathiBrain.in

जुलैमध्ये होणार फक्त पदवीच्या ‘अंतिम सत्रा’च्या परीक्षा !

ब्रेनवृत्त, ८ मे

कोव्हिड-१९‘च्या संसर्गाच्या धोक्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा पेपरही रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच, पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातल्या त्यात, आता केवळ पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली.

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पदवीच्या परिक्षांविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात अंतिम वर्षाची फक्त अंतिम सत्राचीच परीक्षा होणार असून, अन्य सत्रांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

”अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १ जुलै ते ३० जुलै ह्या कालावधीत होणार. त्या आधीच्या सत्रातील परीक्षा होणार नाहीत. संबंधित सत्रांतील विद्यार्थ्यांना नवीन वर्षात प्रवेश देणार. लॉकडाऊन वाढल्यास अंतिम सत्राच्या परीक्षांचा पण २० जून नंतर आढावा घेणार …’ अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तसेच या परीक्षांचे निकालही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार 15 ऑगस्टपर्यंत लावले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी, तसेच अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ परीक्षांचे काय होणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे  वातावरण होते. मात्र विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागानं घेतला नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठांच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले होते. त्यानंतर आज राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, यूपीएससीची ३१ मे रोजी होणारी पूर्व परीक्षा आणि इतर सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. पूर्व परीक्षेसंदर्भातील पुढील तारीख २० मे नंतर दिली जाणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे.

 

◆◆◆

Exit mobile version