Site icon MarathiBrain.in

मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानसह अनेकांचे चीनला समर्थन!

वृत्तसंस्था । आयएएनएस

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


चीनची भूमिका कोणतीही असली, तरी त्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पटलावर पाठींबा देण्याची संधी पाकिस्तान कधीही सोडत नाही. पाकिस्तानने एकूण ६५ देशांच्या वतीने मानवी हक्कांच्या नावाखाली चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या देशांविरुद्ध संयुक्त निवेदन संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या (UN Human Rights Council) ४८ व्या सत्रात सादर केले आहे आणि चीनच्या वर्तमान धोरणांचे व भूमिकांचे समर्थन केले आहे.

हॉंगकॉंग, शिंजियांग व तिबेटच्या संबंधीचे प्रकरण हे चीनचे अंतर्गत विषयी असून, त्यांच्यात बाह्य घटकांनी/देशांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही, अशाप्रकारचे निवेदन पाकिस्तान आणि अन्य देशांनी चीनच्या समर्थनार्थ केले आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सच्या मते, हॉंगकॉंग विशेष प्रशासन क्षेत्रातील चीनच्या ‘एक देश, दोन प्रणाली’ (One Country, Two Systems) या धोरणाला संबंधित निवेदनातून सहभागी देशांनी दुजोरा देण्यात आला आहे.

ब्रेनविश्लेषण । चीनची ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ काय आहे ?

पाकिस्तानसह ६५ देशांच्या या संयुक्त निवेदनात असेही म्हटले आहे, की राष्ट्रांची सार्वभौमिकता, भू-प्रादेशिक अखंडता आणि स्वतंत्रता यांचा मान राखणे आणि सार्वभौम राष्ट्रांच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप न करणे, हे आंतरराष्ट्रीय संबंधांना जोपासण्याचे आधारभूत नियम आहेत. मानवी हक्कांवरून केले जाणारे राजकारण आणि दुटप्पी भूमिकेचा या निवेदनातून विरोध केला आहे.

सोबतच, मानवी हक्क परिषदेत चीनला पाठींबा दर्शवणाऱ्या या देशांनी चीनवरील आरोपांचे विरोध केले असून, चीनवरील आरोपांना काहीही आधार नाही आणि चुकीच्या माहितीच्या आधारे तसेच राजकीय भावनेतून चीनच्या धोरणाला विरोध केला जात असल्याचे यांनी म्हटले आहे. 

चीनी कंपन्यांचा भारतीय महामार्ग प्रकल्पातील सहभाग संपुष्टात

दुसरीकडे, गल्फ सहकार्य परिषदेच्या (GCC : Gulf Cooperation Council) सहा सदस्य देशांनीही चीनच्या वर्तमान भूमिकांना एका संयुक्त पत्राच्या माध्यमातून पाठींबा दर्शवला आहे. तसेच, २०हून अधिक देशांनी त्यांच्या राष्ट्रीय पातळीवर चीनच्या हॉंगकॉंग, शिंजियांग व तिबेटशी संबंधित भूमिकांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version