रियूटर
कतार, ३ डिसेंबर
पेट्रोलियम निर्यातक देशांच्या संघटनेतून (OPEC- Organization of Petroleum Exporting Countries) कतार (खाडीचा देश) येत्या जानेवारीमध्ये बाहेर पडणार असल्याची घोषणा कतारचे ऊर्जामंत्री सद-अल-कबी यांनी आज केली आहे. ६ डिसेंबर २०१८ ला आयोजित ‘ओपेक’ (OPEC) च्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या ऐन मुहूर्तावरच कतारने संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
कतारचे ऊर्जामंत्री सद-अल- कबी यांनी एका पत्रकार परिषदेत येत्या जानेवारी २०१९ पासून पेट्रोलियम निर्यातक देशांच्या संघटनेतून कतार बाहेर पडणार असल्याचे सांगितले. ‘कतारने संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, संघटनेला आजच सकाळी कळवण्यात आले आहे. यानंतर कतार नैसर्गिक वायू निर्यातीच्या दूरगामी लक्ष्यांवर भर देणार आहे’, असे ते म्हणाले.
कतारचा संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वतंत्र असून, संघटनेच्या प्रमुख व इतर अरबी देशांनी २०१७ मध्ये कतारवर आणलेल्या निर्बंधांचा या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचेही सद-अल-कबी यांनी म्हटले आहे. कतारच्या या निर्णयामागे वायू क्षेत्राचा पुरेपूर विकास आणि विस्तार करण्याचा हेतू असल्याचे दिसते. ‘संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय सोपा नव्हता कारण गेल्या ५७ वर्षांपासून आम्ही तिचा भाग आहोत. मात्र पेट्रोलियम क्षेत्रात संघटनेसाठी कतारचे योगदान कमी असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. आता कतार पूर्णतः नैसर्गिक वायू उत्पादनावर भर देणार आहे’, असे कतारचे उर्जामंत्री म्हणाले.
दरम्यान, येत्या ६ डिसेंबर पासून व्हिएनामध्ये सुरू होणाऱ्या ‘ओपेक’ (OPEC) च्या बैठकीत कतार सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत रशियासोबत संघटनेच्या इतर सदस्यांचा समावेश असणार आहे.
जागतिक बाजारपेठेत तेल निर्यात करणाऱ्या ‘पेट्रोलियम निर्यातक देश संघटना’ (ओपीईसी) या महत्त्वपूर्ण संघटनेचा कतार देश जवळपास गेल्या सत्तावन वर्षांपासूनचा सदस्य आहे. जरी पेट्रोलियम निर्यातक देश म्हणून कतारचे या संघटनेत कमी महत्त्व दिसत असले, तरी कतार जगातील सर्वात मोठा द्रवनिय नैसर्गिक वायू (लिक्विफाईड नॅचरल गॅस) निर्यातक देश आहे. येणाऱ्या काळात कतारने नैसर्गिक वायूचे उत्पादन प्रतिवर्षी ७७ मिलियन टन पासून ११० मिलियन टन इतके वाढवण्याचे ठरवले आहे.
◆◆◆