फ्रान्सची ‘केप्लर्क’ ही अर्थतंत्रज्ञान कंपनी ग्राहकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुकानांमार्फत बिटकॉईन विकणार आहे. हा जगाच्या पाठीवरील पहिलाच प्रयोग असणार आहे.
मराठीब्रेन वृत्त
पॅरिस, २२ नोव्हेंबर
तंबाखूजन्य पदार्थांच्या दुकानावर किंवा एखाद्या पानटपरीवर तंबाखू, सिगारेट, विडी, पान मसालाच्या विक्री होते हे आपल्याला माहीत आहे. मात्र तंबाखूच्या दुकानावर ‘बिटकॉईन’ सारख्या अंकात्मक (डिजिटल) आणि गुप्तचलनाची (क्रिप्टोकरन्सी) विक्री व्हावी, ही सामान्य माणसाच्या विचारातही न येण्यासारखी गोष्ट आहे. पण हे आता शक्य होणार आहे. फ्रान्समधील एक कंपनी तेथील तंबाखूच्या दुकानांसोबत यासंबंधीचा करार केला आहे.
ज्या तंबाखू दुकानांमध्ये फ्रान्सचे लोक सिगारेट आणि लॉटरीचे तिकीट घेण्यासाठी जातात त्या दुकानांमध्ये आता ‘बिटकॉईन’ हे गुप्तचलन ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. फ्रान्सची ‘केप्लर्क (Keplerk)’ अर्थतंत्रज्ञान (FinTech) कंपनी फ्रान्समधील तंबाखू दुकानांशी करार करून बिटकॉईन विकण्याचे काम करणार आहे.
रियूटर ने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार केप्लर्क या फ्रेंच कंपनीने स्थानिक रोख रक्कम नोंदणी आज्ञावलीशी (लोकल कॅश रजिस्टर सॉफ्टवेअर) एक करार केला आहे. या करारानुसार फ्रांसमधील तंबाखू दुकानांना त्यांच्या ग्राहकांना बिटकॉईन विकता येणार आहेत. ‘तंबाखूची किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने त्यांच्या ग्राहकांना एक वाउचर प्रदान करतील. या वाउचरच्या आधारे केप्लर्कच्या इलेक्ट्रॉनिक नाणेपेटीद्वारे(वॉलेट) ग्राहकांना बिटकॉईन मिळवता येतील’, असे केप्लर्क कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांसारखी लहान दुकाने बिटकॉईनची विक्री करणार असल्याचा हा प्रयत्न संपूर्ण ‘जगात पहिलाच’ असणार आहे.
आता केप्लर्कसारख्या अर्थ-तंत्रज्ञानाच्या जगात वावरणाऱ्या कंपनीने तंबाखूची दुकानेच हे आभासी नाणेविक्रीसाठी का निवडली? तर केप्लर्कचे व्यासायिक धोरण आणि विकास विभागाचे संचालक आदिल झाखर यांनी त्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. आदिलच्या मते, ‘तंबाखूजन्य पदार्थांच्या दुकानांच्या मालकांवर ग्राहकांचा जास्त विश्वास असतो. असेही ही दुकाने मोबाईल रिचार्ज करण्यासाठीचे वाउचर लोकांना विकतातच. तशाच प्रकारे बिटकॉईन खरेदीचे वाउचरही उत्तमरित्या या दुकानांमार्फत विकले जातील.’Reuters आदिलच्या या विचारामागे पूर्णतः व्यवसायिक दृष्टिकोन दिसत असला तरी ते खरेच आहे. आपल्या भारतातही पानटपरींवर विडी, सिगारेट सोबतच शीतपेय, रिचार्ज वाउचर अशाही वस्तूंची विक्री होतच असते. केप्लर्कने फ्रान्समधील अशाच परिस्थितीला ध्यानात घेऊन बिटकॉईन विक्रीचा विचार केला आहे.
खरंतर, जगात काहीच देशांत आभासी जगतातील बिटकॉईन सारख्या गुप्तचलनांना अधिकृत परवानगी असली, तरी जगाच्या बहुतांश देशांना त्यांतून धोका जाणवत असल्याने अशा चलनांना त्यांनी स्वीकृती दिलेली नाही. केप्लर्कच्या या निर्णयावर फ्रांसच्या केंद्रीय बँकेनेही आपली बाजू स्पष्ट केली आहे. केप्लर्कच्या या पुढाकारावर कोणतीही देखरेख नसणार असून ग्राहकांनी स्वतःच्या जोखिमीवर बिटकॉईन व्यवहार करावा, असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.
फ्रान्सच्या केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बिटकॉईन किंवा इतर अंकात्मक (डिजिटल) नाणे हे चलन नसून फक्त सट्टेबाजीसाठीचे पर्याय आहेत. तरीही या करारामध्ये व बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी ते स्वतःच्या जोखिमीवर करावे.
● केप्लर्क आणि अंकात्मक चलन व्यवसाय:
१) गेल्या दीड वर्षांपासून अर्थतंत्रज्ञानाशी संबंधित असलेली केप्लर्क कंपनी किरकोळ वस्तूंच्या व्यवसायिकांना आणि गुंतवणूकदारांना बिटकॉईन उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.
२) केप्लर्क या प्रकल्पाला ७ टक्के प्रति देवघेव इतकी कमिशन फी आकारून पैसा पुरवणार आहे.
आधीच फ्रान्सच्या २४,००० हजार अधिकृत तंबाखू दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्री व्यतिरिक्त, लॉटरी वाउचर, मोबाईल रिचार्ज वाउचर आणि ध्वनी-चित्रफिती सेवा इत्यादींची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत
● बिटकॉईन आणि गुंतवणूक
बिटकॉईनने आधीच विविधांगी गुंतवणूकदारांना डिजिटल व्यवहारांच्या आणि गुप्तचलन व्यवहारांत आकर्षित केले आहे. यामुळे काहींना असे वाटते की बिटकॉईन सारखे चलन इतर पारंपरिक चलनांना आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या पर्यायांना पुनर्स्थित करू शकते.
केप्लर्कचा हा प्रयोग अगदीच आगळावेगळा आणि नवा आहे. मात्र, हा प्रयोग जगाच्या पाठीवर पहिलाच असला तरी त्याच्या यशानंतर, अशा प्रयोगांचा इतर देशांमध्ये विस्तार होण्यास वेळ लागणार नाही.
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.