जर्मन कंपनी ‘वॉन वेल्क्स’ आपले उत्पादन चीनमधून भारतात हलविणार
ब्रेनविश्लेषण | १९ मे
जर्मनीची पादत्राणे (फुटवेअर) कंपनी ‘वॉन वेल्क्स’ने (Von Wellx) आपला व्यवसाय चीनमधून भारतात स्थलांतरित करण्याची घोषणा केली आहे. ही जर्मन कंपनी आपला व्यवसाय उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हलविण्याची तयारी करत आहे. कंपनीने सध्या आग्रा येथे ‘इयाट्रिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’सोबत (Iatric Industries Pvt Ltd.) करार करून त्याचे उत्पादन सुरू केले आहे. जर्मन पादत्राणे कंपनी वॉन वेल्क्सची उत्पादने बऱ्याच देशांमध्ये विकली जातात. ही कंपनी भारतात अशी उत्पादने तयार करणार आहे, जी पाय आणि सांध्यासाठी उपयुक्त असतील. तसेच, पायांची विश्रांती, पाय, गुडघा आणि पाठदुखी आणि सांधेदुखीवर परिणामकारक असे प्रमुख पादत्राणे निर्माण करणारी कंपनी आहे.
● ही कंपनी ८० देशांमध्ये उत्पादने विकते
जर्मन ब्रँड वॉन वेल्क्सची उत्पादने जगातील सुमारे ८० देशांमध्ये तब्बल १०० दशलक्ष ग्राहकांना विकली जातात. ही कंपनी भारतात २०१९ पासून विक्री करत असून, या कंपनीची उत्पादने आता जगातील ५०० हून अधिक प्रमुख बाजारांत उपलब्ध आहेत. तसेच, या कंपनीची उत्पादने ऑनलाईनही उपलब्ध आहेत.
● उत्तरप्रदेश शासनाने केले स्वागत
उत्तरप्रदेशच्या आग्रा शहरात जर्मन कंपनी येण्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यमंत्री (एमएसएमई) उदय भान सिंग म्हणाले, कासा एव्हर्ज गंभ (Casa Everz Gmbh) यांनी त्यांची कंपनी भारतात सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला फार आनंद झाला आहे. या प्रकारच्या गुंतवणूकीमुळे ही कंपनी येताच राज्यातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल. ही कंपनी चीनहून भारतात येत असून, कंपनीने उत्पादनासाठी उत्तरप्रदेशची निवड केली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
● दहा हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळेल
जर्मनीची सर्वात मोठी फुटवेअर कंपनी वॉन वेल्क्सने आग्राच्या लॅट्रिक इंडस्ट्रीजबरोबर करार केला आहे. लॅट्रिक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जैन यांच्या म्हणण्यानुसार, या ब्रँडच्या भारतात येण्याबरोबरच दहा हजारहून अधिक लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.
● ही कंपनी बनवते काही खास आरोग्यदायी उत्पादने
वॉन वेल्क्स एक अग्रगण्य आरोग्य पादत्राणे उत्पादक कंपनी असून गुडघेदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखीसारख्या आजार असणाऱ्यांना आराम देणारी पादत्राणे बनवते. कासा एव्हर्ज गंभ हे वॉन वेल्क्स ब्रांडचे मालक आहे. संपूर्ण उत्पादन चीनमधून भारतात हलविण्याची त्यांची योजना आहे. दरम्यान, अलीकडेच परकीय गुंतवणूकीसाठी सरकारने केलेले प्रयत्न त्या दिशेने मोठे यश मानले जात आहेत.
◆◆◆