‘वंदे भारत अभियानां’तर्गत आतापर्यंत २४४ विमानांद्वारे ३६ हजार ४३२ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १२ हजार ७८२ आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १२ हजार ४५२ आहे. तसेेच इतर राज्यांतील प्रवाशांची संख्या ११ हजार १९८ इतकी आहे.
ब्रेनवृत्त | मुंबई
‘कोव्हिड-१९’मुळे ओढावलेल्या टाळेबंदीमुळे अडकलेल्या विदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत अभियानां’तर्गत आतापर्यंत २४४ विमानांद्वारे ३६ हजार ४३२ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १२ हजार ७८२ आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १२ हजार ४५२ आहे. तसेेच इतर राज्यांतील प्रवाशांची संख्या ११ हजार १९८ इतकी आहे. दिनांक १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ३५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
मुंबईत आलेल्या या सर्व प्रवाशांचे विलगीकरण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनातर्फे पार पाडली जात आहे. देशात सर्वांत जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असून, महाराष्ट्र ‘कोव्हिड-१९’मुळे गंभीररित्या प्रभावित झाला आहे. राज्याचे महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार मुंबईत आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात करण्याचे काम करण्यात येत आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत केंद्राने घेतले महत्त्वाचे निर्णय!
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
● कोणकोणत्या देशांतून आले प्रवासी?
या देशातून आले प्रवासी ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी,व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया,ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.
दरम्यान, इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक परवाने संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.
(महासंवादच्या संदर्भांसह)